Tanmay Agarwal’s world record for fastest triple century : भारतीय फलंदाजांचा दबदबा जगभर पाहायला मिळतो. विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे अनुभवी फलंदाज काही ना काही विक्रम करत राहतात. त्याच्यामागे तरुणांची फौज तयार केली जात आहे जी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमक दाखवण्यासाठी उत्सुक आहेत. सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात शुक्रवार २६ जानेवारीला अशीच एक खेळी पाहायला मिळाली, ज्याने विश्वविक्रम मोडला. तन्मय अग्रवाल जगातील सर्वात जलद त्रिशतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. या फलंदाजाने षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडताना अनेक दिग्गजांना मागे टाकले.
सर्वात जलद त्रिशतक –
२६ जानेवारी २०२४ रोजी अरुणाचल प्रदेश आणि हैदराबाद यांच्यात झालेल्या रणजी ट्रॉफी सामन्याची इतिहासाच्या पानांमध्ये नोंद झाली आहे. अवघ्या एका दिवसाच्या खेळात तन्मय अग्रवालने गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत त्रिशतक झळकावले. हे स्फोटक त्रिशतक झळकावून तन्मयने विश्वविक्रम आपल्या नावावर केला. या फलंदाजाने अवघ्या १४७ चेंडूत २१ षटकार आणि ३३ चौकारांच्या मदतीने ३२३ धावा केल्या.
कोण आहे तन्मय अग्रवाल?
२८ वर्षीय तन्मयचा जन्म ३ मे १९९५ रोजी आंध्र प्रदेशमध्ये झाला. लहान वयातच जेव्हा त्याचा क्रिकेटकडे कल वाढला तेव्हा त्याच्या पालकांनी त्याला या खेळासाठी प्रोत्साहन दिले. तन्मयच्या स्फोटक खेळाच्या जोरावर तो हैदराबादच्या अंडर-१४ संघात पोहोचला. अंडर-१६, अंडर-१९, अंडर-२२ आणि अंडर-२५ मध्ये टीममध्ये स्थान मिळवण्यात तो यशस्वी झाला. २०१४ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. तन्मयने इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी संघ सनरायझर्स हैदराबादमध्येही स्थान मिळवले. ५६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३५०० हून अधिक धावा केल्या आहेत.
हेही वाचा – क्रिकेटच्या मैदानावर कोलांटउड्या सेलिब्रेशन व्हायरल; वेस्ट इंडिजच्या केव्हिन सिनक्लेअरची धमाल
तन्मय अग्रवालने आता दक्षिण आफ्रिकेच्या मार्को माराइसने १९१ चेंडूत झळकावलेल्या त्रिशतकाचा विक्रम मोडला. त्याने हा पराक्रम अवघ्या १४७ चेंडूत केला. हा पराक्रम वेस्ट इंडिजचा महान फलंदाज व्हिव्ह रिचर्ड्सने २४४ चेंडूत केला होता. एका दिवसात ३०० धावा करून तन्मयने भारतीय दिग्गज वीरेंद्र सेहवागलाही मागे टाकले. २००९ मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्धच्या ब्रेबॉर्न कसोटीत एका दिवसात २८४ धावा केल्या होत्या.