ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जेम्स पॅटिन्सनला बाद केल्याचा आनंद अयोग्य पद्धतीने साजरा केल्याप्रकरणी इशांत शर्माला सामनाधिकाऱ्यांनी दंड ठोठावला आहे. इशांतच्या मानधनातून १५ टक्के रक्कम कापून घेण्यात येणार आहे. सामनाधिकारी रंजन मदुगले यांच्यापुढे झालेल्या सुनावणीत इशांतने आपली चूक मान्य केली. आयसीसीच्या आचारसंहितेच्या पहिल्या स्तरावरील कलम २.१.६चा भंग केल्याप्रकरणी इशांतवर ही कारवाई करण्यात आली आहे. याचप्रमाणे पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा न करता बळी मिळाल्याचा आनंद व्यक्त करायला सुरुवात करणाऱ्या रवींद्र जडेजाला सामनाधिकाऱ्यांनी ताकीद दिली. डेव्हिड वॉर्नरविरुद्ध पायचीतचे अपील करतानाच जडेजाने पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली नव्हती.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर मी गोलंदाजीच्या शैलीत काही बदल केले होते व हे बदलच मला येथे भरपूर यश मिळवून देणारे ठरले. येथील खेळपट्टी गोलंदाजांप्रमाणेच फलंदाजांसाठीही अतिशय फसवी होती. तथापि पुजारा याने संयमी खेळ करीत विजयाचा मार्ग सुकर केला.
-आर. अश्विन
खेळपट्टी फिरकी गोलंदाजीस अनुकूल होती आणि मी दिशा-टप्पा ओळखून गोलंदाजी केली. त्यामुळेच मला भरपूर विकेट्स मिळाल्या. मात्र फलंदाजीत मी अपेक्षेइतक्या धावा करू शकलो नाही याचेच मला दु:ख झाले.
-रवींद्र जडेजा