४९ चेंडूत ६८ धावा; पोलार्डचा १७ चेंडूत ५१ धावांचा झंझावात; मुंबई इंडियन्सचा विजय
रोहित शर्मा जेव्हा मोठी खेळी साकारतो तेव्हा मुंबई इंडियन्सचा विजय निश्चित असतो, याचा प्रत्यत पुन्हा एकदा वानखेडे स्टेडियमवर अनुभवायला मिळाला. सर्वात समतोल संघ असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सला याचा प्रत्यय याच हंगामात दुसऱ्यांदा आला. या हंगामातल्या कोलकाताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहितने नाबाद ८४ धावांची खेळी साकारत विजयाला गवसणी घातली होती, त्याचाच पुन:प्रत्यय या सामन्यातही आला आणि रोहितकडून कोलकात्याला दुसऱ्यांदा पराभूत व्हावे लागले. या सामन्यात रोहितचे दमदार अर्धशतक आणि किरॉन पोलार्डच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर मुंबईने कोलकातावर सहा विकेट्स राखत विजय मिळवला.
कोलकाताच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहितने दुसऱ्याच चेंडूवर अप्रतिम षटकार खेचत डावाची चांगली सुरुवात केली. हा षटकार या विजयाची नांदी होती. पार्थिव पटेल बाद झाल्यावर फलंदाजील्या आलेल्या अंबाती रायुडूने २० चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह ३१ धावांची झंझावाती खेळी साकारली. दुसऱ्या बाजूने रोहित नेत्रदीपक फटक्यांची बरसात करत होताच. खासकरून आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर तो तुटून पडत होता. त्याच्याच १२ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने एकेरी धाव घेत कोलकाताविरुद्ध या हंगामातील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. किरॉन पोलार्डने फलंदाजीला आल्यापासून धडाकेबाद फटक्यांचा सपाटा लावला. आर. सतिशच्या सोळाव्या षटकात त्याने तीन गगनभेदी षटकारांच्या मदतीने २३ धावा लुटल्या. त्यानंतरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर रोहितने एकेरी धाव घेत संघाला दिडशे धावा पूर्ण करून दिल्या. पोलार्डने धडाकेबाज फलंदाजी करत १७ चेंडूंमध्ये ५१ धावांची खेळी साकारली, यामध्ये दोन चौकार आणि सहा षटकारांची अतिषबाजी होती. त्याच्या सहाव्या षटकाराने मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रोहितने ८ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद ६८ धावांची खेळी साकारली.
मुंबईने नाणेफेक जिंकत कोलकाताला फलंदाजीसाठी पाचारण केले आणि दुसऱ्या षटकात मिचेल मॅक्लेघनने कर्णधार गौतम गंभीरला आठ धावांवर जीवदान दिले. त्याचा फायदा त्याने उचललाच. टीम साऊदीच्या चौथ्या षटकात कोलकाताने तीन चौकारांची लूट केली आणि सहाव्या षटकात संघाचे अर्धशतक पूर्ण केले. हरभजनच्या आठव्या षटकात पार्थिव पटेलने रॉबिन उथप्पाला यष्टीचीत करण्याची संधी सोडली, पण त्यानंतर फक्त एक धाव करत उथप्पा (३६) बाद झाला. पण एका बाजूने गंभीरने धावफलक हलता ठेवला. हार्दिक पंडय़ाच्या तेराव्या षटकात षटकार आणि चौकार लगावत त्याने अर्धशतक पूर्ण केले. पण अर्धशतक झळकावल्यावर त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. मॅक्लेघनने आपल्या तिसऱ्या षटकात गंभीरला बाद केले, त्याने सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५६ धावा केल्या. गंभीर बाद झाल्यावर सूर्यकुमार यादव (२१) आणि आंद्रे रसेल (२२) यांनी छोटेखानी खेळ्या साकारल्या. युसूफ पठाणने झंझावाती सुरुवात करत आठ चेंडूंत चार चौकारांसह नाबाद १९ धावा केल्या. मॅक्लेघनच्या १९ व्या षटकात टीम साऊथीने ख्रिस लीन आणि युसूफ पठाण यांना ‘स्क्वेअर लेग’ला तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर जीवदान दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा