‘‘चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय, भारतीय क्रिकेटबाबत घेतलेला पहिला प्रामाणिक निर्णय आहे,’’ अशी प्रतिक्रिया आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदीने दिली.
‘‘लोढा समितीचा निर्णय ही पहिली पायरी आहे. ही अखेरचे टोक नसून सुरुवात आहे.’’ असे मोदीने सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या निर्णयानंतर ट्विट केले. तो पुढे असा म्हणाला की, ‘‘न्याय आणि चिंतनातून आलेला हा निर्णय आहे. त्यामुळे आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. भारतीय क्रिकेटबाबत हा पहिला प्रामाणिक निर्णय आहे आणि तो बीसीसीआय बाहेरून आला आहे. चेन्नई आणि राजस्थान यांच्यावर कायमची बंदी घालायला हवी होती. न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे बीसीसीआयला हे प्रकरण दाबण्यात अपयश आले. अशा प्रकारे सार्वजनिक संस्थेचे काम व्हायला हवे का? बीसीसीआयला लाज वाटायला हवी.
चेन्नई संघाला कारवाई अपेक्षितच!
नवी दिल्ली : सट्टेबाजी प्रकरणात आमच्या संघाचे माजी संचालक गुरुनाथ मय्यप्पन यांना दोषी ठरविल्यानंतर आमच्या संघावर कारवाई होणे अटळ होते, असे चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
चेन्नई संघावर दोन वर्षांकरिता बंदी घालण्यात आली आहे. याबाबत या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘न्यायालयाने दिलेल्या निकालाचा तपशील मी पाहिलेला नाही. त्याबाबत न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान द्यायचे की नाही हे आम्ही कायदेशीर सल्लागारांशी चर्चा करून ठरविणार आहोत. दोन वर्षांनंतर पुन्हा आमचा संघ आयपीएल स्पर्धेसाठी पात्र होईल व आम्ही विजेतेपद मिळवू. गुरुनाथ यांच्यावरील कारवाईबाबत कोणतेही मत व्यक्त करणे चुकीचे होईल.’’
चेन्नई संघाची प्रतिमा ढासळेल काय असे विचारले असता या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘संघाची प्रतिमा मलिन होणार आहे. मात्र पुन्हा आमच्या संघास गौरवशाली प्रतिभा कशी मिळेल याचा आम्ही विचार करीत आहोत. संघाच्या मालकीत बदल होईल की नाही हे आता सांगता येणार नाही.’’
श्रीनिवासन यांनी बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करू नये – वर्मा
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या (आयसीसी) बैठकीत एन. श्रीनिवासन यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) प्रतिनिधी म्हणून दिलेले नामांकन रद्द करावे, अशी मागणी आयपीएल स्पॉट -फिक्सिंग प्रकरण बाहेर काढणारे याचिकाकर्ते आदित्य वर्मा यांनी केली आहे. ते म्हणाले, ‘‘न्यायाधीश लोढा यांच्या समितीने दिलेल्या निर्णयाने आनंदी झालो आहे. खेळाची प्रतिमा मलिन करणाऱ्यांना बीसीसीआयने दूर करावे.  बीसीसीआयने स्वतंत्र समिती स्थापून श्रीनिवासन यांना कायमचे संघटनेबाहेर करावे, अशी माझी इच्छा आहे. तसेच आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधी म्हणून श्रीनिवासन यांना मिळालेले नामांकन रद्द करण्यात यावे.’’

Story img Loader