आंतररष्ट्रीय स्तरावर भारतीय टेनिसची पताका सदैव अभिमानाने फडकावत ठेवणाऱ्या सानिया मिर्झाने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत ऐतिहासिक जेतेपदावर नाव कोरताना आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. स्वित्र्झलडच्या अनुभवी मार्टिना हिंगिसच्या साथीने खेळताना सानियाने कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या महिला दुहेरीच्या ग्रँड स्लॅम जेतेपदाची कमाई केली. महिला दुहेरीचे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावणारी सानिया पहिली भारतीय महिला टेनिसपटू ठरली. जागतिक क्रमवारीत अव्वल आणि अव्वल मानांकित सानिया-मार्टिना जोडीने संघर्षमय लढतीत रशियाच्या एकाटेरिना माकारोव्हा आणि एलेना व्हेसनिना जोडीवर ५-७, ७-६ (४), ७-५ असा विजय मिळवला.
योगायोग म्हणजे विम्बल्डन स्पर्धेत एक तपापूर्वी २००३मध्ये सानियाने कनिष्ठ गटात रशियाच्या अलिसा क्लेयबानोव्हाच्या साथीने खेळताना जेतेपदावर कब्जा केला होता. मिश्र दुहेरीची तीन ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर असणाऱ्या सानियाच्या नावावर महिला दुहेरीच्या जेतेपदाची उणीव होती. २०११मध्ये एलेना व्हेसनिनाच्या साथीने खेळताना सानियाने फ्रेंच खुल्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. पण त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. सानिया-मार्टिना जोडीने इंडियन वेल्स आणि मियामी स्पर्धेतही याच जोडीवर मात करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते.
पहिल्या सेटमध्ये माकारोव्हा-व्हेसनिना जोडीने सानियाची सव्र्हिस भेदली. हिंगिसने लॉबच्या फटक्याचा वापर करत प्रतिस्पध्र्याना रोखले. मात्र रशियाच्या जोडीने सरस खेळ करत बाजी मारली. दुसऱ्या सेटमध्येही टायब्रेकरमध्ये गेलेल्या मुकाबल्यात सानिया-मार्टिना जोडीने ४-१ अशी आघाडी घेतली. ४-५ अशी स्थिती असताना व्हेसनिनाने सव्र्हिस केली, मात्र हिंगिसच्या अफलातून बॅकहँडच्या जोरावर सानिया-मार्टिना जोडीने सेटपॉइंट कमावला. सानियाने ताकदवान फोरहँडच्या जोरावर दुसरा सेट नावावर केला. तिसऱ्या सेटमध्ये सानिया-मार्टिना जोडी २-५ अशा पिछाडीवर होती. मात्र जेतेपदाच्या जिद्दीने खेळणाऱ्या सानिया-मार्टिना जोडीने आपला खेळ उंचावला. सलग पाच गेम जिंकत सानिया-मार्टिना जोडीने तिसऱ्या सेटसह जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा