IPL 2008 and WPL 2023 Opening Match Similarity: मुंबईत खेळल्या जाणाऱ्या महिला प्रीमियर लीगची (WPL 2023) धमाकेदार सुरुवात झाली आहे. डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने गुजरात जायंट्सचा १४३ धावांनी पराभव केला. या सामन्याने सर्वांना इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्याची आठवण करून दिली, ज्यामध्ये कोलकाता नाइट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा १४० धावांनी पराभव केला होता. या दोन सामन्यांमध्ये अनेक समानता आहेत, ज्याने तुम्हाला आश्चर्य वाटेल.
१. नाणेफेक जिंकणारा संघ हरला –
आयपीएलच्या पहिल्या सामन्यात राहुल द्रविडच्या संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण त्याच्या संघाला १४० धावांनी पराभव पत्करावा लागला. तसेच नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणार्या बेथ मुनीच्या गुजरात जायंट्सला १४३ धावांनी पराभव पत्करावा लागला. हे दोन्ही लीगच्या पहिल्या सामन्यातील साम्य राहिले.
२. पहिल्याच सामन्यात २०० पार धावसंख्या –
२००८ मध्ये आयपीएलमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात कोलकाता संघाने प्रथम फलंदाजी करताना २२२ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर, डब्ल्यूपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने देखील २०७ धावा केल्या. अशा प्रकारे पहिल्याच सामन्यात २०० धावांचा टप्पा पार करणारे संघ ठरले.
३. १४० किंवा अधिक धावांनी विजय –
आयपीएल आणि डब्ल्यूपीएलमध्ये आणखी एक स्पष्ट साम्य समोर आले आहे. खरेतर, दोन्ही सामन्यांमध्ये विजयाचे अंतर १४० किंवा त्याहून अधिक धावांचे होते, जे क्रिकेटमध्ये क्वचितच पाहायला मिळते. २००८ मध्ये केकेआरने १४० धावांच्या फरकाने, तर २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सने १४३ धावांनी विजय मिळवला.
४. पराभूत होणारा संघ १५.१ षटकात गारद –
आयपीएलच्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने गोलंदाजीतील पराक्रम दाखवत २२३ धावांचे मोठे लक्ष्य दिले होते. त्यानंतर धावांचा पाठलाग करणाऱ्या आरसीबीला केवळ १५.१ षटकांत ८४ धावांत गुंडाळले. त्याचवेळी, डब्ल्यूपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने २०८ धावांचे लक्ष्य दिले होते. त्यानंतप शानदार गोलंदाजी करताना गुजरात जायंट्सला १५.१ षटकात सर्वबाद केले.
हेही वाचा – IND vs AUS Test: रोहित शर्माचे स्वप्न राहिले अपूर्ण: धोनीच्या ‘या’ खास क्लबमध्ये सामील होण्याची हुकली संधी
५. सामनावीरांचा स्ट्राईक रेटही सारखाच –
आयपीएल आणि डब्ल्यूपीएलमध्ये आणखी एक समानता पाहिला मिळाली. खरं तर, आयपीएलच्या पहिल्या सामन्यात ब्रेंडन मॅक्युलमने ७३ चेंडूत १५८ धावा केल्या होत्या. या डावात त्याचा स्ट्राईक रेट २१६ होता. आणि डब्ल्यूपीएलच्या पहिल्या सामन्यात सामनावीर ठरली ती हरमनप्रीत कौर, जिने ३० चेंडूत ६५ धावा केल्या. या दरम्यान तिचा देखील स्ट्राइक रेट २१६ राहिला.