Neeraj Chopra in World Athletics Championships 2023 : गेल्या वर्षी रौप्य पदकावर समाधान मानाव्या लागणाऱ्या नीरज चोप्राने यंदा मात्र सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली आहे. अॅथलेटिक्स स्पर्धेत भालाफेक खेळात त्याने सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास घडवला आहे. मध्यरात्री बुडापेस्टमध्ये झालेल्या या स्पर्धेनंतर त्याने माध्यमांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुडापेस्टमध्ये रात्री उशिरा ही स्पर्धा पार पडली. त्यानंतर पदक समारंभ होण्यास फारच उशीर झाला. त्यामुळे अनेक पत्रकारांशी त्याला बोलता आले नाही. अखेर त्याने रात्रीच झुम मिटिंगद्वारे माध्यमांशी संवाद साधला. तसंच, दीर्घकाळ वाट पाहायला लागल्याने त्याने माध्यमांची माफीही मागितली. यावेळी त्याला प्रश्न विचारण्यात आला की तू आता स्वतःला सर्वांत महान खेळाडू समजतोस का? त्यावर त्याने अत्यंत नम्रपणे उत्तर दिलं. “मी महान आहे असं मी म्हणणार नाही. मला अजून खूप सुधारणा करायच्या आहेत. जॅन झेलेझनी हे भालाफेकीमध्ये सर्वकाळातील महान खेळाडू आहेत”, असं तो म्हणाला.

हेही वाचा >> Video: पाकिस्तानच्या नदीमला मागे टाकत नीरज चोप्रा ठरला जगज्जेता! बुडापेस्टमध्ये रचला इतिहास

पदक जिंकणं सर्वकाही नाही

“मी यापेक्षाही अधिक उंचीवर भाला फेकू शकतो. भालाफेकपटूला काही मर्यादा नसते. त्यामुळे मला अजून मोठी कामगिरी करायची आहे. मी त्यादिशेने प्रयत्न करणार आहे. एक व्यक्ती किती पदके जिंकू शकतो, हे पाहणं प्रेरणादायी ठरणार आहे. पदक जिंकणं म्हणजे आपण सर्वकाही जिंकलं असं होत नाही. अनेक खेळाडू असे आहेत त्यांनी अनेक पदके जिंकली आहेत. त्यामुळे मी आणखी मेहनत घेणार आहे”, असंही नीरज चोप्रा म्हणाला.

भारत विरुद्ध पाकिस्तान

भालाफेकीची ही स्पर्धा भारत विरूद्ध पाकिस्तान अशी रंगली होती. पाकिस्तानच्या अर्शद नदीमचं नीरज चोप्राला मोठं आव्हान होतं. अर्शदची आत्तापर्यंतची सर्वोत्तम भालाफेक ९० मीटरहून जास्त होती. त्यामुळे नीरजला नदीम कडवी टक्कर देणार असं चित्र दिसत होतं. त्यामुळे या स्पर्धेकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं होतं. त्यावर नीरज म्हणाला की, “मी सहसा स्पर्धेपूर्वी मोबाईल वापरत नाही. मात्र, आज मी तो पाहिला. तेव्हा सर्वांत पहिलं माझ्या लक्षात आलं की भारत विरुद्ध पाकिस्तान अशी चर्चा सुरू आहे. पण तुम्ही पाहिलंत तर, युरोपिअन खेळाडू फार धोकादायक असतात. तिथे फक्त अर्शद नव्हता तर, जॅकब आणि ज्युलियन वेबरसुद्धा होते. त्यामुळे शेवटच्या थ्रोपर्यंत तुम्हाला इतर भालफेक करणाऱ्यांचा विचार करावा लागतो. परंतु, मायदेशात भारत विरुद्ध फक्त पाकिस्तान अशी तुलना होते”, असं चोप्रा म्हणाला.

अॅथलेट्समध्ये पदक कमावल्यानंतर नीरज चोप्रा आता आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेसाठी महिन्याभराचा कालावधी आहे. तेथेही पाकिस्तानी खेळाडू नदीमचं आव्हान असणार आहे. यावर नीरज म्हणाला की, “मला वाटते की आशियाई खेळांमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान या विषयावर अधिक चर्चा होईल, परंतु मी निश्चिंत राहणार आहे.”

रविवारी स्पर्धा संपल्यानंतर नदीम आणि नीरज यांच्यात गप्पा झाल्या. युरोपियन लोकांविरोधात आशियातील दोन स्पर्धकांनी चांगली कामगिरी केली असल्याचंही चोप्रा म्हणाला. “मला बरं वाटलं की अर्शदने चांगला खेळ केला आणि आता आमचे दोन्ही देश कसे पुढे जात आहेत यावर आम्ही चर्चा केली. या खेळात पूर्वी युरोपियन खेळाडू होते, पण आता आम्हीही त्यांच्यात सामील झालो आहोत.”

जय हिंदच्या घोषणा झाल्या

कोविड काळात टोकियोच्या ऑलिम्पिकमध्येही नीरजने सुवर्णपदक जिंकले होते. परंतु, कोविड काळातील बंधनांमुळे तिथे फारशी गर्दी नव्हती. याबाबत नीरज म्हणाला की, “टोकियामध्ये या गर्दीची कमी होती. तिथे अॅडिल सर उपस्थित होते. आजही ते येथे आहेत. इथं मोठ्याप्रमाणात गर्दी आहे. भारतीयांचीही गर्दी असून जय हिंदच्या घोषणाही झाल्या. खूपजण पुढे आले आणि त्यांनी अॅथलेटिक्सला पाठिंबा दिला आहे.”