Team India created history by first three batsmen scoring half centuries : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २३५ धावांची मोठी धावसंख्या उभारली. त्यामुळे गोलंदाजांचे काम सोपे झाले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला केवळ १९१ धावा करता आल्या. आणि ४४ धावांनी सामना गमावला. हा सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. यासह यशस्वी जैस्वाल, इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड या त्रिकुटाने एक विक्रम आपल्या नावावर केला, जो यापूर्वी कोणालाही करता आला नव्हता.
यशस्वी जैस्वालने झंझावाती सुरुवात करत २५ चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकारांसह ५३ धावा केल्या. यानंतर इशान किशन ३२ चेंडूत ५२ धावा करून बाद झाला. किशनने तीन चौकार आणि चार षटकार मारले. शेवटी ऋतुराज गायकवाड ४३ चेंडूत ५८ धावांची खेळी खेळून बाद झाला. त्याने दोन षटकार आणि तीन चौकार मारले. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात भारताच्या पहिल्या तीन फलंदाजांनी अर्धशतके ठोकण्याची ही पहिलीच वेळ होती. टी-२० क्रिकेटमधील मागील चार सामन्यांमध्ये असे घडले होते, जेव्हा संघाच्या पहिल्या तीन फलंदाजांनी अर्धशतके केली होती, परंतु एकाही प्रसंगी त्यात भारताचा सहभाग नव्हता.
विराट कोहली, रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या त्रिकुटाने भारतासाठी अनेक विक्रम केले आहेत. हे तिघेही टी-२० मध्ये पहिल्या तीन स्थानांवर फलंदाजी करत असत, परंतु हे दिग्गज कधीही एकत्र अर्धशतक झळकावू शकले नाहीत. भारताचा युवा टी-२० संघ चमकदार कामगिरी करत आहे. पहिल्या सामन्यातही भारताने २०० हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत विजय मिळवला होता.
हेही वाचा – Virat Kohli: नाकावर पट्टी, कपाळावर आणि गालावर जखमेच्या खुणा, काय झालं विराटला? जाणून घ्या
एका डावात पहिल्या तीन फलंदाजांचे ५० हून अधिक धावसंख्या –
ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, अॅडलेड, २०१९
बर्म्युडा वि बहामास, कूलिज, २०२१
कॅनडा वि पनामा, कूलिज, २०२१
बेल्जियम वि माल्टा, गेंट, २०२२
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तिरुवनंतपुरम, २०२३