भारतात २०३२ मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी उत्सुक असलेल्या भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) पहिल्यांदाच रस दाखविला असून त्यासाठी आयओएने आता मदतीसाठी सरकारशी संपर्क साधण्याचे ठरवले आहे.

आयओएचे अध्यक्ष नरेंदर बात्रा यांनी या वर्षी भारत दौऱ्यावर आलेले आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघाचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांच्याशी बोलणी करून २०३२च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचा विचार करण्यात यावा, असे सांगितले होते. बाख यांनी भारताच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे. आयओएने २०३२च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी याआधीच आपली उत्सुकता असलेले पत्र आयओसीकडे सादर केले आहे.

आयओएचे महासचिव राजीव मेहता यांनी या महिन्यात टोकियो येथे जॅकलिन बॅरेट यांच्या अध्यक्षतेखालील आयओसीच्या निविदा सादर करणाऱ्या तीनसदस्यीय समितीची भेट घेतली होती. ‘‘२०३२ साली ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी आम्ही गंभीर आहोत. याआधीच आम्ही उत्सुकतेचे पत्र आयओसीकडे सादर केले आहे. त्याचबरोबर मी आयओसीच्या निविदा समितीची भेट घेतली आहे. त्यांनी आयोजनासाठी स्वागत केले असून लवकरच भारत ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करू शकेल, अशी ग्वाही दिली आहे,’’ असे मेहता यांनी सांगितले.

आयओएच्या वरिष्ठ  पदाधिकाऱ्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनासाठी नवी दिल्ली आणि मुंबई या दोन ठिकाणांचा विचार केला आहे. मात्र अन्य शहरांचाही विचार केला जाण्याची शक्यता आहे. आयओएने पहिल्यांदाच आयओसीकडे ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनासाठी रस दाखवला आहे. २०३२च्या ऑलिम्पिक आयोजनासाठीच्या निविदा प्रक्रियेला २०२२ सालापासून सुरुवात होणार असून २०२५ मध्ये विजेत्या शहराची निवड केली जाईल. भारतापाठोपाठ इंडोनेशिया, चीन, ऑस्ट्रेलिया, उत्तर आणि दक्षिण कोरिया, जर्मनी हे देश ऑलिम्पिक आयोजनासाठी उत्सुक आहेत.

आयओएच्या २२ डिसेंबरला होणाऱ्या आगामी सर्वसाधारण सभेत निविदा प्रक्रियेसाठी ठराव संमत केला जाणार आहे. त्यानंतर आयोजनाविषयीच्या योजना सरकारसमोर ठेवण्यात येणार आहेत. २०२२ पासून निविदा प्रक्रियेला प्रारंभ होणार असला तरी त्याआधी भारत सरकारची परवानगी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे, असे मेहता यांनी सांगितले.

Story img Loader