मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिन तंदुरुस्त झाला असून, भारताविरुद्ध बुधवारपासून ईडन गार्डन्सवर सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी तो उपलब्ध झाला आहे.
‘‘संघाला माझी गरज असल्यास, तिसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी मी सज्ज आहे. नेटमध्ये मी सोमवारी सहा षटके टाकली, मला गोलंदाजी करताना कोणत्याही वेदना होत नव्हत्या. गोलंदाजी प्रशिक्षक माझ्या कामगिरीवर समाधानी असल्यास, माझी संघात निवड होण्याची शक्यता आहे,’’ असे फिन याने सांगितले. दुखापतीमुळे फिनला संपूर्ण भारत दौऱ्याला मुकावे लागेल, असा जाणकारांचा अंदाज होता, पण तंदुरुस्तीत सुधारणा घडवून आणत फिनने २७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान डी. वाय. पाटील अकादमी संघाविरुद्ध मुंबईत झालेल्या तीनदिवसीय सराव सामन्यात आपली तंदुरुस्ती सिद्ध केली.
‘‘मला लवकरच भारत सोडून मायदेशी परतावे लागेल, असे वाटले होते. दुसऱ्या कसोटीसाठी संघात परतण्याची मला आशा होती, पण दुखापत बरी होण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला,’’ असेही त्याने सांगितले. मुंबई कसोटीत विकेट मिळवण्यात अपयशी ठरलेल्या स्टुअर्ट ब्रॉडच्या जागी फिनला संधी मिळण्याची शक्यता आहे.    

Story img Loader