कोणत्याही खेळाच्या प्रशिक्षणाबरोबरच या खेळासाठी आवश्यक असणारी तंदुरुस्ती व आहार याकडेही लक्ष देणे अनिवार्य असते, असे लिएंडर पेसचे वडील व ज्येष्ठ तंदुरुस्तीतज्ज्ञ डॉ. वेस पेस यांनी येथे सांगितले.
लक्ष्य फाऊंडेशनतर्फे टेनिसपटूंसाठी आयोजित केलेल्या तंदुरुस्ती मार्गदर्शन कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. पेस येथे आले होते. त्यानिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, आपल्या देशात प्रशिक्षणामध्ये कौशल्य वाढविण्यावर भर दिला जातो. केवळ कौशल्य असून उपयोग नाही. टेनिस हा अधिक गतिमान खेळ झाला आहे. या खेळात अधिक ऊर्जा, तंदुरुस्तीची आवश्यकता आहे. तसेच पोषक आहाराचीही त्यास सांगड घालणे आवश्यक आहे. आहाराचे नियोजन करताना खेळाडूची सांस्कृतिक पाश्र्वभूमी, सवयी लक्षात घेतल्या पाहिजेत. त्याखेरीज आहारातील घटकपदार्थ, आहाराच्या वेळा याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता असते.शालेय जीवनात अनेकजण टेनिस सुरू करतात, मात्र टेनिसमध्ये कारकीर्द करण्यासाठी १२ ते १४ वर्षे या वयोगटात स्पर्धात्मक खेळ म्हणून त्यावर लक्ष देण्याची गरज असते. या वयातच रॅकेट कशी पकडायची याचे ज्ञान आत्मसात करता येते असेही डॉ. पेस यांनी सांगितले.
  या कार्यशाळेस आदित्य जावडेकर, अभिषेक ताम्हाणे, ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, हेमंत बेंद्रे, संदीप कीर्तने हेही उपस्थित होते.

Story img Loader