सचिन चाळिशीचा आहे असं त्याच्याकडे पाहून वाटत नाही, कारण त्याच्याकडे असलेला उत्साह, प्रामाणिकपणे अथक मेहनत करण्याची वृत्ती बरंच काही शिकवून जाते. गेले २३ वर्षे तो आंतरराष्ट्रीयक्रिकेटमध्ये खेळतोय, पण त्याचा फिटनेस तरुणांना लाजवेल असाच आहे. आजही तो युवा खेळाडूंसारखाच धावतो, खेळतो, तो उत्साहाचा झरा आहे. काही खेळाडू चाळिशीपर्यंत खेळले, पण त्यामधील फारच कमी खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त होते. एक खेळाडू म्हणून तुमच्याकडे गुणवत्ता असली तरी त्या जोडीला फिटनेस नक्कीच लागतो. पूर्णपणे फिट असल्याशिवाय तुम्ही खेळूच शकत नाही. सचिनला या गोष्टींची पूर्णपणे जाणीव आहे आणि त्यामुळेच तो फिटनेसवर एवढा भर देतो. आता या वयातही तो सरावाला नाही म्हणत नाही, उलट संघात सर्वात जास्त व्यायाम आणि सराव करणारा तोच असेल. आताच्या घडीलाही तो चार तास सराव आणि व्यायाम करतो, यामधूनच युवा पिढीने भरपूर शिकण्यासारखे आहे. एवढी वर्षे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळतोय, पण कधीही तो अनफिट असल्याचे जाणवले नाही. आपण जी गोष्ट करतो, त्यासाठी शंभर टक्के योगदान देण्याची त्याची वृत्ती बरंच काही शिकवून जाते. त्याच्याबरोबर खेळणारे खेळाडू आता प्रशिक्षण देताना दिसतात, काही समालोचकही झाले आहेत. त्याच्यानंतर आलेले खेळाडूही क्रिकेट खेळताना दिसत नाहीत. आताच्या युवा क्रिकेटपटूंबरोबर खेळत असताना तो त्याच्यापेक्षा फिटनेसमध्ये कुठेच कमी वाटत नाही.
चाळीसाव्या वर्षी साधारणत: लोकांच्या हालचाली मंदावतात. कारण या वयामध्ये वजन वाढायला लागतं आणि धावपळीमध्ये आपलं शरीरराकडे काही अंशी दुर्लक्ष होतं. पण सचिनकडून या वयातही फिटनेसकडे दुर्लक्ष होणार नाही. ४० हे वय वार्धक्याकडे झुकणारं असतं असं आपण सारेच बोलत असतो, पण त्याच्याकडे बघून तो ४० वर्षांचा आहे, असं कधीच वाटत नाही. त्याचा तजेलदार चेहरा असो किंवा मैदानातली कामगिरी, युवा खेळाडूंना लाजवेल असाच त्याचा फिटनेस आहे. कारण सचिन हा एक चांगला क्रिकेटपटू तर आहेच, पण एक चांगला व्यक्तीही आहे आणि त्यापेक्षाही तो ‘फिटनेसचा महामेरू’ आहे.
त्याची आणि माझी भेट आमच्याच नवी मुंबईच्या व्यायामशाळेत झाली होती. डी. वाय. पाटील स्टेडियमवर एक सामना होता. त्यावेळी जोरदार पाऊस होता, सामना होऊच शकणार नाही, अशीच परिस्थिती होती. पण तरीही सचिन सामन्याच्या आदल्या दिवशी माझ्या व्यायामशाळेत आला. सर्व प्रकारांचा त्याने कसून सराव केला. मग ते कार्डिओ असू दे किंवा अन्य बरेच व्यायाम प्रकार, त्याने मन लावून व्यायाम केला. तेव्हा त्याच्यामधील प्रामाणिकपणा, सचोटी, समर्पण, जिद्द, चिकाटी, अथक मेहनत घेण्याची तयारी या साऱ्या गोष्टी दिसल्या. त्यावेळी बऱ्याच खेळाडूंनी सामना होणार नसल्यामुळे आराम करायचे ठरवले होते, पण सचिन मात्र नित्यनियमानुसार व्यायामशाळेत आला होता, हाच मोठा फरक सचिन आणि अन्य खेळाडूंमध्ये आहे आणि म्हणूनच तो महान आहे.
व्यायामशाळेत आल्यावर एवढय़ा मोठय़ा माणसाला आपण काय सांगणार आणि सांगितलं तरी तो ऐकणार का, अशी भीती माझ्या मनात होती खरी, पण तसं झालं नाही. माझ्यासमोर एखादा विद्यार्थी यावा आणि त्याने माझ्याकडून काही गोष्टी शिकाव्यात, असंच त्यावेळी घडलं. आपण क्रिकेटचे सम्राट आहोत, असं कुठेही त्याच्याबरोबर बोलताना मला जाणवलं नाही. मोठय़ा माणसांची हीच खरी ओळख असते, कितीही प्रसिद्ध झालो तरी त्यांचे पाय कायम जमिनीवर पाहायला मिळतात, तसाच सचिन होता. प्रत्येक व्यायाम सुरू करण्यापूर्वी ‘मी हे कसं करू, किती वेळ करू, काही चुकत असेल तर सांगा’ असं सचिन म्हणत होता. सचिन जगभर फिरलाय, त्याने बऱ्याच व्यायामशाळा पाहिल्या असतील, बरेच मोठे मार्गदर्शक त्याला लाभले असतील, पण तरीही माझ्याशी बोलताना कुठलाही अहंकार, अहंपणा त्याच्यामध्ये जाणवला नाही. एका साध्या विद्यार्थ्यांने व्यायामशाळेत यावं, मार्गदर्शकाच्या सल्ल्यानुसार व्यायाम करावा, बऱ्याच गोष्टी शिकून घ्याव्यात, असंच त्याच्या बाबतीतही घडलं. आदर्श विद्यार्थी कसा असावा, याचे उत्तम उदाहरण सचिन होता. एवढय़ा मोठय़ा उंचीवर पोहोचूनही एक विद्यार्थी राहणं सोपं नसतं, पण त्याच्यामध्ये शिकण्याची भूक होती. जे काही शिकता येईल, जे काही मार्गदर्शन मिळेल ते घ्यायचं, असं जणू त्याने ठरवलेलं होतं. कुठलीही आडकाठी त्याने केली नाही.
सचिन व्यायामात तल्लीन झाला होता, त्यामुळे त्याला त्रास होणार नाही म्हणून आम्ही कोणालाही त्याच्याजवळ पाठवले नव्हते. फक्त त्याला मार्गदर्शन करण्यासाठी, काही टिप्स देण्यासाठी मी होते. व्यायाम करताना जी सचिनची एकाग्रता होती, ती आतापर्यंत फार कमी जणांमध्ये मी पाहिलेली आहे. जे काही करायचे ते प्रामाणिकपणे, पूर्णपणे झोकून देऊनच. व्यायाम केल्यानंतर थोडय़ा आरामाची गरज असते, पण सचिन व्यायामशाळेत आला आहे हे कळल्यावर बऱ्याच जणांनी गर्दी केली होती. व्यायाम संपवून सचिन बाहेर आला आणि त्याने चाहत्यांना पाहिले. ‘मी फार थकलोय, नंतर भेटू’ असं त्याला बोलता आलं असतं, पण त्याने सर्वाना सह्य़ा दिल्या, बऱ्याच जणांना फोटो काढू दिले. कोणत्याही प्रकारचा त्रागा, तक्रार त्याने केली नाही. यावरूनच सचिन माणूस म्हणून किती चांगला आहे, हे दिसून येते.
जे तुम्ही करत असता तेच तुमच्या वागण्या-बोलण्यातून जाणवत असतं. सचिनला कसलेच वाईट व्यसन नाही किंवा आरोग्याला अपाय करणाऱ्या जाहिरातींना त्याने दिलेला नकार, बरंच काही सांगून जातो. तुमच्यावर झालेले संस्कार, विचार, दृष्टिकोन, मतं, व्यासंग या सर्वानी माणूस घडत असतो आणि तसं वागत असतो. मैदानातही तो कधी रागावलेला, कोणाला चिडवताना, हिणवताना, अश्लील भाषा वापरताना दिसलेला नाही. या सर्वातूनच सचिन हा एक व्यक्ती म्हणून किती महान आहे, याचा परिचय येतो. सचिनबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. आत्ताची पिढी त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करताना दिसते, पण त्याच्या या मेहनतीकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली जाते. सचिनला त्यांनी पाहावं आणि त्याच्याकडून शिकावं असं बरंच काही आहे. तो खेळाचा राजदूत तर आहेच, पण सर्वासाठीच एक आदर्श आहे.
चाळिसाव्या वाढदिवसाच्या त्याला शुभेच्छा देताना फक्त एवढंच सांगेन, ‘तू फक्त खेळत राहा, आतापर्यंत तू तुझा फिटनेस जसा चोख राखलाय, तसा यापुढेही राखशील याची खात्री आहे. खेळाचा असाच अवीट आनंद, स्वर्गीय क्षण देत राहा, देव तुला दीर्घायुष्य देवो.’
(शब्दांकन : प्रसाद लाड)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा