स्थानिक क्रीडाप्रेमींनी दिला आठवणींना उजाळा
नागपूर : भारतीय इतिहासात ज्या अनेक गुरु-शिष्यांच्या जोडय़ा गाजल्या आहेत, त्यात रमाकांत आचरेकर आणि सचिन तेंडुलकर ही जोडी प्रसिद्ध आहे. या जोडीला एकत्र बघण्याची संधी नागपूरकरांना लाभली होती. १८ जुल २००९ मध्ये ठाकरे कला व सांस्कृतिक अकादमीतर्फे गुरू-शिष्यांचा आगळावेगळा सत्कार समारंभ नागपूरच्या डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, प्रवीण आमरे, विनोद कांबळी, दिवं. शरद ठाकरे व समीर दिघे या आचरेकरांच्या शिष्यांनी एकत्र येत त्यांचा सत्कार केला होता. आज बुधवारी आचरेकर यांच्या निधनाचे वृत्त धडकताच स्थानिक क्रीडाप्रेमींनी नऊ वर्षांपूर्वीच्या त्या सत्कार समारंभाच्या आठवणींचा उजाळा दिला.
गुरुपौर्णिमेनिमित्त विदर्भाचे माजी रणजीपटू आणि आचरेकरांचे नागपुरातील शिष्य दिवं. शरद ठाकरे यांनी त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.
या समारंभासाठी नागपूरकरांनी एकच गर्दी केली होती. यावेळी आचरेकर यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांचे मनोगत मंच संचालिका रेणुका देशकर यांनी वाचून दाखवले होते. आज येथे आलेल्या माझ्या शिष्यांनी स्वत:ला झोकून देत क्रिकेट खेळावे आणि आपल्या चाहत्यांना आनंद द्यावा. या खेळाडूंची कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर जावी, असे आशीर्वाद त्यांनी यावेळी दिले होते. गुरुपौर्णिमेनिमित्त आचरेकर सरांविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करताना सचिन तेंडुलकर यांनी माझ्या आयुष्याचे शिल्पकार आचरेकर सर असल्याचे सांगितले होते. यावेळी सचिन तेंडुलकर यांनी आचरेकर यांना शाल-श्रीफळ देऊन तर विनोद कांबळी आणि प्रवीण आमरे यांनी पुष्पहार घालून कृतज्ञता व्यक्त केली होती.
समीर दिघे यांनी सन्मानपत्र प्रदान केले तर दिवं. शरद ठाकरे यांनी गुरुदक्षिणा म्हणून पाच लाख रुपयांची थली आचरेकर सरांना अर्पण केली होती. आचरेकर यांची ती नागपूर भेट अखेरची ठरली.
दिग्गज खेळाडूंना घडवण्याचे मोठे कार्य
सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज खेळाडूंना घडवण्याचे मोठे कार्य आचरेकर सरांच्या हातून घडले. अगदी साधे राहून त्यांनी आपले आयुष्य क्रिकेटला समíपत केले. गुरू-शिष्यांतील आपुलकीचे उत्तम उदाहरण म्हणून नव्या पिढीला सचिन तेंडुलकर आणि आचरेकर सरांकडे बघता येईल. त्यांच्या क्रिकेटच्या योगदानाबद्दल सलाम.
– प्रशांत वैद्य, माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू