अमेरिका, कोस्टा रिका, अर्जेटिना, इटली आणि नेदरलँण्ड्स या पाच संघांचे २०१४च्या विश्वचषकात सहभागी होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे. त्यामुळे बुधवापर्यंत यजमान ब्राझीलसह ३२ पैकी १० संघांनी आपले विश्वचषकातील स्थान निश्चित केले आहे. कॉनकाकॅफ अर्थात उत्तर-मध्य अमेरिका आणि कॅरेबियन महासंघातर्फे अमेरिका आणि कोस्टा रिका यांनी तर युइफा अर्थात युरोपियन फुटबॉल महासंघातर्फे इटली आणि नेदरलँण्ड्सने याचप्रमाणे दक्षिण अमेरिका महासंघाकडून अर्जेटिनाने ब्राझीलमध्ये होणाऱ्या विश्वचषकाचे तिकीट पक्के केले आहे.

विश्वचषक फुटबॉलच्या पात्रतेचे समीकरण
ब्राझील येथे होणाऱ्या २०१४ विश्वचषकात ३२ संघ सहभागी होणार आहेत. ३१ संघ खंडवार पात्रता फेरीचा अडथळा पार करत मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरतील. यजमान नात्याने ब्राझीलचे स्थान सुरक्षित असेल, त्यांना पात्रता फेरीचे सामने खेळावे लागणार नाही. सहा विविध महासंघांमध्ये होणाऱ्या लढतींमधून विश्वचषकाचे संघ निश्चित होत आहेत.
आशियाई फुटबॉल महासंघ (एएफसी)
विश्वचषकाच्या चार किंवा पाच स्थांनासाठी या महासंघातून ४३ संघांमध्ये मुकाबला आहे. चार थेट पात्रता फेरीच्या स्थानांसह आणखी एका संघाला विश्वचषकात प्रवेश मिळू शकतो. कॉन्मेबोल आंतर-खंड प्लेऑफ लढतीत विजय मिळवल्यास पाचव्या संघाला विश्वचषकाचे तिकीट मिळू शकते.
पात्र ठरलेले संघ : जपान, ऑस्ट्रेलिया, इराण, दक्षिण कोरिया.
आफ्रिकन फुटबॉल महासंघ (सीएएफ)
विश्वचषकाच्या पाच स्थानांसाठी या महासंघातल्या तब्बल ५२ संघांमध्ये चुरस रंगणार आहे. अजूनही या गटातून एकाही संघाने विश्वचषकाचे तिकीट पक्के केलेले नाही.
उत्तर-मध्य अमेरिका आणि कॅरेबियन महासंघ  (कॉनकाकॅफ)
चार स्थानांसाठी या गटातल्या ३५ संघांमध्ये लढत होणार आहे. या गटातून अजूनही २ संघांना विश्वचषकात खेळण्याची संधी मिळू शकते.
पात्र ठरलेले संघ : अमेरिका, कोस्टा रिका.
दक्षिण अमेरिका महासंघ (कॉन्मेइबोल)
या गटातून सर्वाधिक संघांना प्रतिनिधित्व करण्याची संधी आहे. चार स्थानांसाठी ९ संघांमध्ये मुकाबला होणार आहे. अन्य संघांच्या समीकरणात बदल झाल्यास गटातल्या आणखी एका संघाला विश्वचषकाचे तिकीट मिळू शकते.
पात्र ठरलेला संघ : अर्जेटिना.
ओशॅनिया फुटबॉल महासंघ (ओएफसी)
या गटातल्या संघांना दुर्मीळ संधी आहे, कारण या गटातून केवळ  एकच संघ पात्र ठरणार आहे.
युरोपियन फुटबॉल महासंघ (युइफा)
या गटातील ५३ संघ १३ स्थानांसाठी झुंजणार आहेत. अजूनही गटातल्या ११ संघांचे विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न साकार होऊ
शकते.
पात्र ठरलेले संघ : नेदरलँण्डस, इटली.
* अमेरिकेची मेक्सिकोवर मात
मेक्सिकोवर २-० अशी मात करत अमेरिकेने ब्राझीलवारी पक्की केली. इडी जॉन्सन आणि डोनाव्हॅन या दोघांच्या प्रत्येकी एक गोलच्या
जोरावर अमेरिकेने हा विजय मिळवला. फुटबॉल विश्वचषकात खेळण्याची अमेरिकेची ही सलग सातवी वेळ असणार आहे.
* कोस्टा रिकाने जमैकाला रोखले
कोस्टा रिकाने जमैकाविरुद्धची लढत १-१ अशी बरोबरीत सोडवली. पनामा आणि होंडुरास यांच्यातील लढत बरोबरीत सुटल्याने कोस्टा रिकाचा विश्वचषकात खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. रांडेल ब्रेन्सने ७५व्या मिनिटाला कोस्टा रिकातर्फे गोल केला. या गोलच्या आधारे कोस्टा रिका विजय मिळवणार असे चित्र होते. मात्र अंतिम मिनिटांमध्ये जर्मेन एँडरसनने गोल करत १-१ बरोबरी केली.
* नेदरलँण्ड्सच्या विजयात
रॉबिन व्हॅन पर्सी चमकला रॉबिन व्हॅन पर्सीने केलेल्या दोन शानदार गोलच्या जोरावर नेदरलँण्ड्सने अ‍ॅन्डोराला २-० असे पराभूत केले आणि विश्वचषकात दिमाखात प्रवेश केला.
*  इटलीचा चेक प्रजासत्ताकवर विजय
चारवेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या इटलीने ब्राझील विश्वचषकासाठी आपले स्थान पक्के केले. पहिल्या सत्रात पिछाडीवर पडलेल्या इटलीने चेक प्रजासत्ताकवर २-१ असा विजय मिळवला. इटलीतर्फे मारिओ बालोटेलीने केलेला गोल निर्णायक ठरला. याआधी इटलीकडून जिर्ओजी चिइलनीने हेडरद्वारे गोल केला होता, त्यानंतर चेकतर्फे लिबोर कोझकने सुरेख गोल केला. मात्र बालोटेलीने निर्णायक गोल करत इटलीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
* अर्जेटिनाची सरशी
अर्जेटिनाने पॅराग्वेवर ५-२ अशी मात करत आपले स्थान पक्के केले. ब्राझीलला यजमान या नात्याने थेट प्रवेश देण्यात आहे, त्यामुळे दक्षिण अमेरिका गटातून विश्वचषकासाठी पात्र ठरणारा पहिला संघ होण्याचा मान अर्जेटिनाने मिळवला आहे. लिओनेल मेस्सीने पेनल्टीच्या आधारे दोन गोल केले. सर्जिओ ऑग्युरो, अँजेल डी मारिआ आणि मॅक्सी रॉड्रिग्यूझ यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.

Story img Loader