T20 World Cup 2022 full schedule: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ऑस्ट्रेलियात होणाऱ्या यंदाच्या T20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार भारत पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेशसह सुपर 12 मध्ये आहे. तर श्रीलंका, नामिबिया, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंडचे चार संघ १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या टप्प्यास पात्र ठरण्यासाठी आमनेसामने असतील. यामधून निवडलेल्या दोन संघांना सुपर 12 मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.
तर, भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी एमसीजी येथे पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. T20 विश्वचषकाचे सामने १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान खेळवले जाणार आहेत.
संपूर्ण स्पर्धेत भारत एकूण पाच सामने खेळणार आहे. पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध, २७ ऑक्टोबर रोजी अ गटातील उपविजेत्यासह दुसरा, ३० ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा, त्यानंतर चौथा सामना २ नोव्हेंबर रोजी बांगलादेशशी आणि पाचवा सामना ६ नोव्हेंबर रोजी गट ब विजेत्यासह होईल.
T20 विश्वचषकाचे सामने अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात ठिकाणी होणार आहेत. अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. तर, उपांत्य फेरीचे सामने ९ आणि १० नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड ओव्हल येथे होणार आहेत.
त्याचबरोबर विश्वचषक सामन्यांसाठी तिकिटांची विक्री ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मात्र, या काळात करोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचेही पालन करावे लागणार आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेचा हा आठवा हंगामअसेल. ICC T20 विश्वचषक २००७ मध्ये सुरु झाला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने ही ट्रॉफी जिंकलेली आहे.