२०२१ हे वर्ष भारतीय क्रीडा विभागासाठी उत्तम ठरले. या वर्षी क्रीडा जगताशी निगडीत अनेक घटना घडल्या, क्रिकेटविश्वातील अनेक खेळाडूंनीही हे वर्ष संस्मरणीय बनवले. दुसरीकडे नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताचे नाव उंचावले. जाणून घेऊया, क्रीडा जगताशी संबंधित अशा घटना ज्यांनी हे वर्ष आणखी खास बनवले.

क्रिकेट आणि भारत

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकली. या विजयासह टीम इंडियाने इतिहास रचला आणि ऑस्ट्रेलियात दोन कसोटी मालिका जिंकणारा आशिया संघ बनला. त्याचबरोबर भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आणि कर्णधार या जोडीनेही यंदा खेळाडूंचा निरोप घेतला. विराटने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले असतानाच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळही संपुष्टात आला आहे. या दोघांच्या जोडीने अतुलनीय कामगिरी करून संघाला नव्या उंचीवर नेले.

टी-२० विश्वचषकातील मोठ्य़ा सामन्याचे हे वर्ष लोकांसाठी नेहमीच संस्मरणीय असेल. दुबईत खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला. वर्ल्डकपच्या सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत करण्याची किंवा एवढा मोठा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे वर्ष देखील लक्षात राहील कारण भारतीय क्रिकेट संघाला एक नवा कर्णधार मिळाला. हिटमॅन म्हणजेच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला पाच वेळा विजेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माला राष्ट्रीय निवड समितीने २०२३ एकदिवसीय विश्वचषकापर्यंत कर्णधार बनवले. धोनीसाठी २०२१ हे वर्ष खूप चांगले होते कारण चेन्नई सुपर किंग्जने (CSK) कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) पराभव करून चौथ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावले.

BWF वर्ल्ड टूर २०२२१ : पी. व्ही. सिंधूचे रौप्यपदक

BWF वर्ल्ड टूर २०२१ फायनलमध्ये भारताच्या पी.व्ही. सिंधूने रौप्यपदक जिंकले. कोरियाच्या की सेयाँगला विजेतेपद मिळाले. BWF वर्ल्ड टूर २०२१च्या पुरुष एकेरीत, व्हिक्टर एक्सेलसेनने चषक जिंकला.

अंजू बॉबी जॉर्ज : वुमन ऑफ द इयर

भारतीय ऍथलीट अंजू बॉबी जॉर्ज हिने जागतिक ऍथलेटिक्सचा वुमन ऑफ द इयर पुरस्कार जिंकला. तरुण मुलींना खेळासाठी तयार करण्यासाठी तिने पुरस्कार पटकावले आहेत.

जागतिक चॅम्पियनशिपमध्ये अंशू मलिकला रौप्यपदक

६ ऑक्टोबर २०२१ रोजी, अंशू मलिक जागतिक कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली.

सुहास यथीराज : पॅरालिम्पिक पदक जिंकणारे पहिले IAS अधिकारी

नोएडाचे विद्यमान जिल्हा दंडाधिकारी सुहास ललिनकेरे यथीराज हे पॅरालिम्पिक पदक जिंकणारे पहिले IAS अधिकारी ठरले.

टोक्यो पॅरालिम्पिक : सुमित अंतिलचे सुवर्णपदक

भारताच्या सुमित अंतिलने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले. २३ वर्षीय सुमित अंतील हा हरयाणातील सोनीपत येथील आहे. त्याने ६८.५५ मीटर थ्रो करत विश्वविक्रम केला.

टोक्यो पॅरालिम्पिक : अवनी लेखराचे सुवर्णपदक

भारतीय नेमबाज अवनी लेखरा हिने टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले. अवनी पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. १० मीटर एअर रायफल प्रकारात तिने हे सुवर्णपदक जिंकले.

नीरज चोप्राने घडवला इतिहास

भारताचा युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. विशेष म्हणजे ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत भारताचे हे पहिलेच पदक आहे. नीरज चोप्राच्या या कामगिरीबद्दल राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. टोक्यो २०२० ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ ऑगस्ट २०२१ रोजी भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्नचे नाव हॉकीचे दिग्गज मेजर ध्यानचंद यांच्या नावावर करण्याची घोषणा केली. खेलरत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद यांच्या नावावर ठेवण्यासाठी भारतभरातील नागरिकांकडून त्यांना अनेक विनंत्या येत असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

भारतीय हॉकी संघाचे ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक

भारतीय पुरुष हॉकी संघाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. भारतीय पुरुष हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. याआधी भारतीय पुरुष हॉकी संघाने १९८० च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

सिंधूचे ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक

भारताची स्टार शटलर पी.व्ही. सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. ऑलिम्पिकमध्ये दोन वैयक्तिक पदके जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. याआधी २०१६ च्या ऑलिम्पिकमध्ये तिने रौप्यपदक जिंकले होते.

भारताच्या प्रिया मलिकची हंगेरीतील कामगिरी

हंगेरी येथे झालेल्या जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत भारताच्या प्रिया मलिकने कुस्तीत सुवर्णपदक जिंकले. तिने महिलांच्या 73 किलो वजनी गटात पदक जिंकले.

मीराबाई चानूने रचला इतिहास

मीराबाई चानूने ऑलिम्पिक इतिहासात वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पहिले रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. चानूने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले.

हेही वाचा – “मास्टर ब्लास्टर मैदानावरील…” सचिनच्या मैत्रिणीचे प्राण वाचवल्यानंतर मुंबई पोलिसांनी केलं ‘असं’ ट्वीट!

सुनील छेत्रीचा लिओनेल मेस्सीला दणका

३६ वर्षीय भारतीय फुटबॉल स्टार सुनील छेत्रीने अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीला मागे टाकून ७४ गोलासह दुसरा सर्वाधिक सक्रिय आंतरराष्ट्रीय गोल करणारा खेळाडू ठरला.

मिताली राज : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये १०,००० धावा करणारी मिताली राज ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात मितालीने ही कामगिरी केली.

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन

भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी २४ फेब्रुवारी २०२१ रोजी गुजरातमधील मोटेरा येथे जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमचे उद्घाटन केले.

Story img Loader