Rishabh Pant Year Ender 2022: भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतसाठी २०२२ चा शेवट खूप वाईट होता. नवीन वर्षाच्या दोन दिवस अगोदर एका कार अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे. दिल्ली-हरिद्वार महामार्गावर शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता कार अपघातात पंत गंभीर जखमी झाला. तो गाडीत एकटाच होता. अपघातानंतर त्याच्या कारला आग लागली.
या अपघातामुळे पंतच्या कपाळावर दोन कट झाले आहेत, उजव्या गुडघ्यातील अस्थिबंधन फाटले असून उजव्या हाताच्या मनगटाला, घोट्याला, पायाला दुखापत झाली आहे. पंत धोक्याबाहेर असल्याचे कळताच त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, पंत आता क्रिकेटच्या मैदानात कधी परतणार हे सांगणे कठीण आहे.
आता आपण २०२२ मधील ऋषभ पंतच्या क्रिकेट प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत, हे वर्ष त्याच्यासाठी खूप निराशाजनक होते. लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये त्याने आपले कौशल्य दाखवले, पण पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे.
ऋषभ पंतची वनडेतील कामगिरी –
पंतने यावर्षी एकदिवसीय फॉर्मेटमध्ये १० डाव खेळले आणि ३७.३३च्या सरासरीने आणि ९६.५५ च्या स्ट्राइक रेटने ३३६धावा केल्या. या वर्षात त्याने केवळ एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्याची यंदाची सर्वोच्च धावसंख्या १२५आहे, जी इंग्लंडविरुद्ध आली होती.
ऋषभ पंतची टी-२० मधील कामगिरी –
टी-२० मध्ये पंतची आकडेवारी सर्वात वाईट आहे. पंतने २१ डावांमध्ये फलंदाजी केली आहे. ज्यामध्ये त्याने २१.४१ च्या खराब सरासरीने आणि १३२.८४च्या स्ट्राइक रेटने फक्त ३६४ धावा केल्या आहेत. ऋषभ पंतला २१ डावांमध्ये फक्त एकच अर्धशतक झळकवता आले आहे.
ऋषभ पंतची कसोटीतील कामगिरी –
पंतने कसोटी क्रिकेटमध्ये आपला दमदार खेळ दाखवला आहे. यावर्षी १२ डावात ६१.८१ च्या सरासरीने ६८० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतके आणि ४ अर्धशतके झळकावली. पुन्हा एकदा, त्याचा स्ट्राइक रेट ९०,९० चा राहिला आहे.