अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत शनिवारी इटलीच्या फ्लाविया पेनेटाने आपल्याच देशाच्या रॉबर्टा विंचाचा सरळ सेटमध्ये पराभव करून एकेरीतील पहिले ग्रॅंडस्लॅम विजेतेपद पटकावले. मात्र, या विजयानंतर पेनेटाने लगेचच निवृत्ती जाहीर करीत टेनिसरसिकांना धक्काही दिला.
तेहतीस वर्षीय पेनेटाने रॉबर्टा विंचीचा ७-६(४), ६-२ असा पराभव केला. ग्रॅंडस्लॅम विजेतेपद पटकावणारी पेनेटा सर्वाधिक वयाची चौथी क्रीडापटू आहे. याआधी २०१० मध्ये इटलीच्या फ्रान्सेस्का शिवोन हिने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा जिंकली होती.
मला याच पद्धतीने टेनिसमधील कारकीर्दीला अलविदा करायचे होते, असे पेनेटाने विजयाचा करंडक घेण्यापूर्वी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले. मला खूप आनंद झाला आहे. प्रत्येक खेळाडूला एखाद्या मोठ्या विजयासह कारकीर्दीचा शेवट व्हावा, असे वाटत असते. माझ्या बाबतही तेच घडले आहे. त्यामुळे मला विशेष आनंद झाला आहे, असे पेनेटा म्हणाली. आपण महिन्याभरापूर्वीच निवृत्तीचा निर्णय घेतला होता, असेही तिने सांगितले.