भारताचे प्रशिक्षक म्हणून कामगिरी चांगली नसल्यामुळे डंकन फ्लेचर यांची हकालपट्टी होणार अशी जोरदार चर्चा होती. परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांना अभय देताना एक वर्षांची मुदतवाढ दिली आहे.
६४ वर्षीय फ्लेचर यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ मार्च महिन्याअखेरीस संपत होता. परंतु शुक्रवारी झालेल्या बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये त्यांना एक वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
‘‘गेली दोन वष्रे फ्लेचर भारतीय संघासोबत आहेत. याचप्रमाणे भारतासमोर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेचे आव्हान समोर आहे. त्यामुळे तडकाफडकी निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे फ्लेचर यांच्या करारात वाढ करण्यात आली आहे,’’ असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील मालिकांतील ‘व्हाइटवॉश’नंतर गतवर्षी इंग्लंडकडून मायदेशातील मालिकेतही भारताने पराभव पत्करला होता. या १० कसोटी सामन्यांतील पराभवांच्या पाश्र्वभूमीवर फ्लेचर यांच्या भवितव्याविषयी चर्चा सुरू होती. फ्लेचर यांच्या कारकीर्दीत भरताला आशिया चषक क्रिकेट स्पध्रेची अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले, याचप्रमाणे आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेची उपांत्य फेरी गाठता आली नव्हती.
फ्लेचर नशीबवान; गावस्कर यांचे टिकास्र
पीटीआय, नवी दिल्ली
भारताच्या कोणत्याही प्रशिक्षकाला दहा कसोटी सामन्यांत पराभव पत्करल्यावर स्थान टिकवता आले नव्हते. परंतु खराब  कामगिरीनंतरही मुदतवाढ मिळणारा फ्लेचर नशीबवान आहे, असे मत भारताचे माजी कप्तान सुनील गावस्कर यांनी प्रकट केले आहे.
‘‘फ्लेचर जर भारतीय असते, तर त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता नव्हती. भूतकाळातील कामगिरीकडे दृष्टिक्षेप टाकल्यास एक गोष्ट लक्षात येईल की, मालिका गमावणाऱ्या कोणत्याही भारतीय प्रशिक्षकाची हकालपट्टी करण्यात आली आहे,’’ असे गावस्कर यांनी सांगितले.
‘‘फ्लेचर यांच्या कारकिर्दीत भारताने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये मोठे पराभव पत्करले आहेत. विश्वविजेते असतानाही भारताला आशिया चषक जिंकता आला नव्हता. त्यांच्या कारकिर्दीत आपण कोणता चषक जिंकलेला नाही. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेची उपांत्य फेरीसुद्धा आपण गाठू शकलो नव्हतो,’’ असे गावस्कर यांनी एका मुलाखतीत सांगितले.

फ्लेचर यांची प्रशिक्षकपदाची कारकिर्द
    कसोटी     एकदिवसीय    टी-२०
सामने     २२    ४४        १७
विजय    ८    २५        ९
पराभव    १०    १६        ८
अनिर्णीत    ४    –        –
टाय    २    –                  –

Story img Loader