आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत राखीव खेळाडूंना संधी न दिल्याबद्दल संघव्यवस्थापनावर टीकास्त्र सोडणाऱ्या सुनील गावस्कर यांनी आता मुख्य प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांना लक्ष्य केले आहे. डंकन यांची हकालपट्टी करून राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्याची सूचनाही गावस्कर यांनी केली आहे.
कामगिरीच्या निकषानुसार फ्लेचर यांना दहापैकी दीड गुण मिळतील. त्यांच्या जागी युवा प्रशिक्षकाची नियुक्ती करावी. राहुल द्रविडप्रती खेळाडूंमध्ये प्रचंड आदर आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिज, इंग्लंडमध्ये आपण कसोटी मालिका जिंकली आहे. संघातील सुपरस्टार खेळाडूही त्याचे बोलणं ऐकतात. एखाद्या सामन्यापूर्वी द्रविड किती कसून तयारी करतो याची खेळाडूंना जाण आहे.
२०१५ विश्वचषकासाठी केवळ अकरा महिने बाकी आहेत, विश्वचषक स्पर्धा इतकी जवळ आलेली असताना प्रशिक्षक तसेच अन्य सहकाऱ्यांच्या पदामध्ये कोणताही बदल करायचा नाहीये. मात्र गॅरी कर्स्टनच्या नेतृत्वाखाली असणारा चमू असता तर ठीक होते, मात्र फ्लेचर यांनी काहीच केलेले नाही. क्रिकेटपटू म्हणून त्यांची कामगिरी सर्वसाधारण होती. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांना डच्चू दिला. खेळाच्या आधुनिकतेशी प्रशिक्षक निगडित हवा. खराब कामगिरीसाठी वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि हरभजन सिंग यांना डच्चू दिला जाऊ शकतो, तर फ्लेचर यांना वेगळा न्याय का, असा सवाल गावस्कर यांनी केला आहे.