ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनला आम्ही घाबरत नाही, असे इंग्लंडचे प्रशिक्षक अ‍ॅन्डी फ्लॉवर यांनी सांगितले. याचप्रमाणे पर्थवरील खराब कामगिरीचा अ‍ॅशेसमधील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या निकालावर कोणताही परिणाम होणार नाही, असे ते पुढे म्हणाले.
तीन सलग अ‍ॅशेस मालिका गमावल्यानंतर पुन्हा अ‍ॅशेस जिंकण्याच्या इष्रेने ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. ब्रिस्बेन आणि अ‍ॅडलेडमध्ये जॉन्सनच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लिश फलंदाजांनी शरणागती पत्करली. प्रती ताशी १५० किमी वेगाने गोलंदाजी करणाऱ्या जॉन्सनच्या खात्यावर आता १७ बळी जमा आहेत. त्यामुळे ‘वाका’च्या घरच्या मैदानावर तो अधिक त्वेषाने गोलंदाजी करू शकेल. इंग्लिश फलंदाजांच्या वाईट कामगिरीनंतरही फ्लॉवर यांनी आम्ही जॉन्सनला भीत नसल्याचे आत्मविश्वासाने सांगितले आहे.
‘‘घाबरलो असे मी म्हणणार नाही. प्रदिर्घ काळ फलंदाजी करण्यासाठी लागणारे कौशल्य आणि दृढता हा समन्वय साधण्यात आमचे फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांसमोर कमी पडले,’’ असे फ्लॉवर यांनी सांगितले.

Story img Loader