हातावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर चॅम्पियन्स लीग स्पर्धा डोळ्यांपुढे ठेवून मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सरावाला सुरुवात केली आहे. आयपीएलदरम्यान सचिनच्या हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला आयपीएलचा अंतिम सामना खेळता आला नव्हता.
चॅम्पियन्स लीग स्पर्धा २१ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या दिवसांमध्ये भारतातील विविध केंद्रांवर होणार आहे. या स्पर्धेची पात्रता फेरी १६ सप्टेंबरपासून सुरू होईल.
चाळिशीमध्ये पदार्पण करणाऱ्या सचिनने आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे, तर दुखापतीमुळे १३ मेपासून त्याने एकही सामना खेळलेला नाही.
सनराजयर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात सचिनने नाबाद ३८ धावा फटकावल्या होत्या आणि याच सामन्यामध्ये त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर सलग पाच सामने तो मुंबई इंडियन्सकडून खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीमध्ये रोहित शर्माकडे मुंबई इंडियन्सचे नेतृत्व सोपवण्यात आले होते आणि रोहितने संघाला पहिल्यांदा आयपीएलचे जेतेपद जिंकून दिले होते. वर्षअखेरीस भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार असून, त्यावेळी सचिन २००वा कसोटी सामना खेळण्याची शक्यता आहे.
‘‘मे महिन्यात आयपीएलदरम्यान माझ्या हाताला दुखापत झाली होती. दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने त्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. गेल्या दहा दिवसांपासून मी सरावाला सुरुवात केली आहे आणि आगामी चॅम्पियन्स लीग स्पर्धा असून या स्पर्धेवर माझे लक्ष असेल.’’
                  -सचिन तेंडुलकर