पुणे : श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत आम्हाला नव्या दमाच्या खेळाडूंकडे लक्ष देण्याची संधी मिळाल्याचे सांगून भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी एकार्थी प्रमुख खेळाडूंचा काळ संपत चालल्याचे जणू सूतोवाच केले. श्रीलंकेविरुद्ध पुणे येथे झालेल्या ट्वेन्टी-२० सामन्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘‘बहुतेक खेळाडू आता जागतिक कसोटी अजिंक्यपद आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत आम्हाला नव्या उदयोन्मुख खेळाडूंकडे लक्ष देणे शक्य होत आहे.’’ द्रविड यांनी या वेळी स्पष्टपणे कुणाचे नाव घेतले नाही; पण त्यांचा कल संघातील प्रमुख खेळाडूंकडेच होता. ‘‘त्यांचा काळ आता संपत आला आहे. नव्या दमाच्या खेळाडूंनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे आणि काही करत आहेत. अशा वेळी उदयोन्मुख खेळाडूंवर विश्वास दाखवणे केव्हाही चांगले आहे,’’असे त्यांनी सांगितले.
दुसऱ्या सामन्यातील पराभवाबद्दल विचारता त्यांनी दिवस आमचा नव्हता, असे सांगितले. ‘‘नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी घेण्याच्या निर्णयाचेही त्यांनी समर्थन केले. आव्हानाचा पाठलाग करताना नेहमीच मैदानावरील दवाचा परिणाम होतो. आमच्या खेळावरही तो झाला; पण आम्ही सुरुवातीलाच फलंदाज गमावले. अखेरच्या षटकापर्यंत आम्ही खेळलो. सुरुवातीचे फलंदाज खेळपट्टीवर टिकले असते, तर निर्णय वेगळा दिसला असता,’’ असे द्रविड म्हणाले.