मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर टेनिसमध्ये दुहेरीत आपला ठसा उमटविल्यानंतरही भारताचे माजी टेनिसपटू लिअँडर पेस आणि महेश भूपती यांनी भारतीय टेनिसपटूंनी प्रगतीसाठी एकेरीवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे मत मांडले आहे.
‘‘आम्ही दुहेरीतच खेळलो, म्हणून प्रत्येक खेळाडूने दुहेरीतच खेळले पाहिजे असे आम्ही कधीच म्हणणार नाही. ग्रँडस्लॅम स्पर्धेत ८०च्या दशकात रमेश कृष्णन यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. त्यानंतर अद्याप एकेरीत भारतीय टेनिसपटू तिथपर्यंत पोचू शकलेला नाही,’’ असेही भूपती म्हणाला. पेस आणि मी दुहेरीत सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे. त्या स्थानापर्यंत तुम्हाला पोहोचायचे असेल, तर त्याला कितीतरी वर्षे लागतील, असेही मत या दोघांनी व्यक्त केले.
टेनिसमध्ये एकेरीवर लक्ष्य केंद्रित करण्याचा सल्ला देताना पेसने युवा पिढीसमोर २० वर्षीय कार्लोस अल्कराझचे उदाहरण ठेवले. पेस म्हणाला, ‘‘तो आता कुठे २० वर्षांचा आहे आणि टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानावर आहेत. आपल्याकडे या वयाची मुले कुमार गटात खेळायचे की व्यावसायिक टेनिस खेळायचे याच विचारात गर्क आहेत. एकेरीत नावारूपाला येणे कठीण आहे. पण, खेळाडूने कारकीर्दीत आव्हानांचा सामना करायलायच हवा.’’
‘‘एकेरीत नाव कमावणे कठीण असले, तरी ते अशक्य निश्चित नाही. यासाठी सर्वात आधी मानसिकता बदलायला हवी. कुठल्याही स्तरावरून आपण बाहेर पडून भरारी घेऊ शकतो. अर्थात, त्यासाठी मनाची आणि मेहनतीची तयारी हवी,’’असे भूपती म्हणाला. टेनिस कोर्टवर सर्वोच्च स्थान मिळवल्यानंतरही कारकीर्दीच्या अखेरीस वेगळे झालेल्या पेस-भूपती यांची भारतीय टेनिस बाबत असलेले विचार मात्र जुळून आले. भारतीय टेनिसमध्ये जरूर सुधारणा दिसून येत आहे. पण, देशाला एकेरीतील विजेता खेळाडू मिळण्यास वेळ लागेल, असे दोघेही म्हणाले.
‘‘टेनिसमध्ये प्रगती होत असली, तरी ती पुरेशी नाही. मार्गात अनेक समस्या आहेत. या समस्या दूर करण्यासाठी सध्या तरी कोणतेही उपाय आपल्याकडे नाहीत. असते, तर आम्ही ते यापूर्वीच केले असते,’’असे पेस म्हणाला.