वेस्ट इंडिज ‘अ’ संघाने पहिल्या अनधिकृत कसोटीत भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवला होता. बुधवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत दिमाखदार प्रदर्शनासह या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय ‘अ’ संघ प्रयत्नशील आहे. पहिल्या कसोटीनंतर भारतीय संघात तीन मातब्बर खेळाडूंचा समावेश झाला आहे. भारतीय एकदिवसीय संघातून बाहेर ठेवण्यात आलेले वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि झहीर खान यांच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष आहे. युवा चेतेश्वर पुजारा दिग्गजांचा समावेश असलेल्या संघाचे नेतृत्व कसे करतो यावर साऱ्यांच्या नजरा आहेत. सेहवागने मागील ३० कसोटीत शतक झळकावलेले नाही तर गंभीर जानेवारी २०१० पासून ४० डावांमध्ये कसोटी शतकाचा टिळा माथी लावू शकलेला नाही. दुसरीकडे झहीर खानही ऑक्टोबर २०१० नंतर डावात पाच बळी घेण्याची किमया करू शकलेला नाही. २०११  विश्वचषकानंतर तो केवळ सात कसोटी सामने खेळू शकला आहे. कामगिरीबरोबरच या त्रिकुटाच्या तंदुरुस्तीचा मुद्दा चर्चेत आहे. एनकेपी साळवे चॅलेंजर स्पर्धेतही सेहवाग, गंभीरची कामगिरी यथातथाच राहिल्याने त्यांच्यावर दडपण अधिक आहे. मात्र या तिघांच्या समावेशामुळे भारतीय संघाला बळकटी मिळाली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेपूर्वी फॉर्म सिद्ध करण्याची संधी पुजाराकडे आहे.
अष्टपैलू खेळ करत निवड समितीसमोर आपला दावा पेश करण्याची संधी अभिषेक नायरसमोर आहे. परवेझ रसूलने पहिल्या कसोटीत डावात पाच बळी टिपले होते. या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी रसूल प्रयत्नशील असेल. ईश्वर पांडे, शमी मोहम्मद, उदय कौल या गोलंदाजांकडून भारतीय संघाला मोठय़ा अपेक्षा आहेत.
वेस्ट इंडिज संघातील क्रेग ब्रेथवेट, किर्क एडवर्ड्स आणि किरेन पॉवेल जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. वीरासॅमी परमॉल आणि निकिता मिलर यांनी भारतीय फलंदाजांना नामोहरम केले होते. दुसऱ्या कसोटीवर कब्जा करत मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवण्यासाठी वेस्ट इंडिज संघाचा प्रयत्न आहे, मात्र सेहवाग-गंभीर-झहीर त्रिकुटामुळे वेस्ट इंडिजला विजयासाठी बरीच मेहनत करावी लागणार आहे.

Story img Loader