खराब फॉर्ममुळे भारतीय संघाबाहेर गेलेल्या उमेश यादवची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड झाली आहे. या दौऱ्यासाठी तयारी म्हणून उमेश मुंबईविरुद्धच्या रणजी लढतीत विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या सामन्यात चेंडूची दिशा आणि टप्पा यांच्यावर भर देणार असल्याचे उमेशने सांगितले.
‘‘मी खूप विचार करत नाही. चेंडूची दिशा आणि टप्पा यांच्यावर नियंत्रण राखणे हेच माझे उद्दिष्ट आहे. दक्षिण आफ्रिकेत वातावरण आणि खेळपट्टय़ा वेगळ्या असणार आहेत. उजव्या यष्टीवर मारा करण्याचा माझा प्रयत्न असेल,’’ असे उमेशने सांगितले.
‘‘अंतिम संघात समावेश व्हावा, यासाठी मी प्रार्थना करत आहे. कोणाचीही निवड होऊ शकते. कुठल्याही खेळपट्टीवर चेंडू वळवू शकतील असे फिरकीपटू आपल्या संघात आहेत. मला अंतिम संघात स्थान मिळाल्यास सर्वोत्तम प्रदर्शनाचा प्रयत्न असेल. परंतु माझ्या समावेशापेक्षा संघाचे संतुलन महत्त्वाचे आहे,’’ असे यादवने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘‘झहीर खानची अनेक दिवसांनंतर भेट झाली. माझ्या तंदुरुस्तीविषयी त्याने चौकशी केली. चेंडूची दिशा आणि टप्प्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला. वेगवान गोलंदाजाला सामन्याचा सराव होणे आवश्यक असते. दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्टय़ांवर चेंडूला उसळी मिळते. मुंबईत खेळण्याचा दक्षिण आफ्रिकेत फायदाच होईल. तंदुरुस्तीची पातळी सिद्ध करण्याकरिता रणजी सामने योग्य व्यासपीठ आहे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा