दमदार प्रदर्शनासह अ‍ॅशेस मालिकेवर कब्जा करणाऱ्या इंग्लंड संघावर पाचव्या आणि अंतिम कसोटीत फॉलोऑनची नामुष्की ओढवली. ऑस्ट्रेलियाच्या ४८१ धावांसमोर खेळताना इंग्लंडची ७ बाद १०८ अशी अवस्था झाली होती. शनिवारी इंग्लंडचा पहिला डाव १४९ धावांत गडगडला. मोइन अलीने सर्वाधिक ३० धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे मिचेल जॉन्सन आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. ऑस्ट्रेलियाला ३३२ धावांची प्रचंड आघाडी मिळाल्याने त्यांनी इंग्लंडला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावातही इंग्लंडची सुरुवात खराब झाली. अ‍ॅडम लिथ १० धावांवर बाद झाला. अ‍ॅलिस्टर कुक आणि इयान बेल यांनी अर्धशतकी खेळी करत डाव सावरला. मात्र मिचेल मार्शने बेलला क्लार्ककडे झेल देण्यास भाग पाडले. मिचेल जॉन्सनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा जो रुटचा प्रयत्न फसला. त्याने ११ धावा केल्या. तिसऱ्या दिवशी उपाहाराला खेळ थांबला तेव्हा कुक ५४ तर जॉनी बेअरस्टो २० धावांवर खेळत आहेत.

Story img Loader