इंडियन सुपर लीगच्या आगमनासह देशातील फुटबॉलच्या लोकप्रियतेला चालना मिळाली, असे मत भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने व्यक्त केले. आयएसएलच्या पहिल्या हंगामात खेळू न शकलेला छेत्री दुसऱ्या हंगामात मुंबई सिटी एफसी संघाचा भाग असणार आहे. निकोलस अनेलकाच्या साथीने खेळणारा सुनील मुंबई संघाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.
‘‘दर्जेदार सामने आणि प्रसारमाध्यमांनी केलेले सुरेख वार्ताकन यामुळे देशातील फुटबॉलला आयाम मिळाला. युवा खेळाडूंमध्ये फुटबॉल खेळण्याची ऊर्मी वाढली आहे. सामने पाहायला येणाऱ्या चाहत्यांसह कॉर्पोरेट उद्योगसमूहांचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे,’’ असे छेत्रीने सांगितले.
तो पुढे म्हणाला की, ‘‘फुटबॉलमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवायचा असेल तर खेळ समाजाभिमुख होणे आवश्यक आहे. आयएसएलच्या माध्यमातून मोहिमेचा पहिला टप्पा गाठला आहे. पायाभूत सुविधा, अव्वल दर्जाचे प्रशिक्षण, आहारतज्ज्ञ आणि तांत्रिक पाठबळ, स्पर्धामध्ये सहभाग, देशांतर्गत खेळांचे जाळे अशा असंख्य गोष्टींमध्ये सुधारणेला प्रचंड वाव आहे.’’
‘‘हा स्थित्यंतराचा कालखंड आहे. भारतीय संघाला नवीन प्रशिक्षक लाभले आहेत. राष्ट्रीय संघाबरोबरच लीगमधील कामगिरीमध्येही सुधारणा होणे गरजेचे आहे. कामगिरी चांगली झाली तर अन्य गोष्टी आपोआप सुधारतील,’’ असा विश्वास छेत्रीने व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा