दर चार वर्षांनी युरोपातील देशांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘युरो चषक’ स्पर्धा सध्या रोमांचक लढतींपेक्षा हुल्लडबाज प्रेक्षकांमुळे चर्चिली जात आहे. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या या स्पध्रेत रशियन समर्थकांच्या या अघोरी खेळाची प्रचीती वारंवार येत आहे. फ्रान्समधील शहरांमध्ये चौकाचौकांत रशियाचे समर्थक इंग्लंडच्या चाहत्यांवर हल्ले करत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रचंड दडपण निर्माण झाले आहे. इंग्लंड आणि रशिया यांच्यातील द्वंद्व हे सर्वज्ञात आहेच. त्यांच्यातील राजकीय, वैचारिक मतभेद आणि इतिहासाची किनार, यामुळे उभय देशांमध्ये भांडणे ही नित्याचीच. मात्र, या वेळी इंग्लंडच्या माध्यमातून फ्रान्सवरही निशाणा साधण्याची संधी रशियाने साधली. फ्रान्स आणि रशिया यांच्यात २४ जून ते १४ डिसेंबर १८१२ या काळात झालेला हिंसाचार हा त्याला कारणीभूत आहे. या युद्धात जवळपास सहा लाखांहून अधिक लोकांचे बळी गेले. म्हणूनच रशियाच्या सामन्यात मोठय़ा प्रमाणात फौजफाटा तैनात करण्याचे आदेश स्पध्रेपूर्वीच देण्यात आले होते. रशियन चाहतेही संपूर्ण तयारीनिशी फ्रान्समध्ये दाखल झाले होते. त्याचे प्रत्यंतर इंग्लंड आणि रशिया यांच्यातील सामन्याआधी आणि सामन्यानंतर आलेच. हे असेच घडणार, याची पूर्वकल्पना असल्यामुळे पोलिसांचा ताफा स्टेडियमभोवती होता. तरीही जे घडायचे ते घडलेच. सामन्याआधी स्टेडियमबाहेर रशिया आणि इंग्लंडचे चाहते एकमेकांना भिडले आणि स्टेडियममध्येही हेच चित्र दिसले. यामध्ये इंग्लंडचे चाहते सर्वाधिक दुखापतग्रस्त झाले. दोघे तर कोमात गेले. हा हिंसाचार इथेच थांबला नाही. इंग्लंड आणि वेल्स यांच्या लढतीनंतरही रशियन चाहत्यांकडून इंग्लंडच्या चाहत्यांना लक्ष्य करण्यात आले. मात्र, या वेळी इंग्लंड आणि वेल्सच्या चाहत्यांकडून रशियाबाबत अश्लील वाक्य वापरण्यात आल्याने हा वाद झाला.

जिंकण्याची ईष्र्या ही प्रत्येकामध्ये असते, त्यासाठी कोणत्याही थराला जाण्यासाठी ते कचरत नाही. आपला संघ जिंकावा यासाठी जशी खेळाडूंमध्ये चढाओढ असते, तशी ती प्रेक्षकांमध्येही. मात्र, प्रेक्षकांमधील ईष्र्या कधीही हिंसक वळण घेऊ शकते आणि याचे ताजे उदाहरण युरो चषक स्पध्रेत वारंवार पाहायला मिळत आहे. शुक्रवारी क्रोएशिया आणि चेक प्रजासत्ताक यांच्यातील लढत सुरू असताना क्रोएशियाच्या चाहत्यांनी मैदानावर ज्वलनशील पदार्थ टाकले. त्यामुळे सामना काही काळ थांबवण्यात आला. फुटबॉलच्या इतिहासात अशा घटना याआधीही घडल्या आहेत. त्यामुळे फुटबॉलच्या खऱ्या चाहत्यांसाठी हे नवीन नसले तरी वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे खेळाची प्रतिमा डागाळली जात आहे, हे लक्षात घ्यायला हवे. ‘८० ते ९० टक्के प्रेक्षक हे सामन्याचा आनंद लुटायला येतात. हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या मूर्खाच्या डोक्यातून अशी कृत्ये जन्म घेतात आणि खेळ कलंकित होतो,’ असे मत इंग्लंडचे माजी फुटबॉलपटू रॉबी फॉवलर यांनी व्यक्त केले. ‘हुल्लडबाज प्रेक्षक अन् फुटबॉलच्या प्रतिमेला बट्टा!’ हा सूचक इशारा फॉवलर यांनी आपल्या वाक्यातून दिला आहे. २०१८ साली फुटबॉल विश्वचषक रशियामध्ये खेळवण्यात येणार आहे, त्या वेळीही अशी हुल्लडबाजी आणि अघोरी कृत्य घडण्याची शक्यता असल्याचे भाकीत वर्तवले जात आहे. मुळात खेळाचे मैदान हे रणांगण नव्हे, हे चाहत्यांनी सर्वप्रथम समजून घेण्याची गरज आहे. फुटबॉल हा एक खेळ आहे. तो जसा खेळभावनेने खेळला जातो, तसा तो खेळभावनेने बघितलाही जायला हवा. अशी कृत्ये करून काय साध्य होते कुणास ठाऊक, पण यामुळे खेळाची प्रतिमा मलिन होत असल्याचे या चाहत्यांनी समजून घेण्याची गरज आहे.

 

Story img Loader