दर चार वर्षांनी युरोपातील देशांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘युरो चषक’ स्पर्धा सध्या रोमांचक लढतींपेक्षा हुल्लडबाज प्रेक्षकांमुळे चर्चिली जात आहे. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या या स्पध्रेत रशियन समर्थकांच्या या अघोरी खेळाची प्रचीती वारंवार येत आहे. फ्रान्समधील शहरांमध्ये चौकाचौकांत रशियाचे समर्थक इंग्लंडच्या चाहत्यांवर हल्ले करत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रचंड दडपण निर्माण झाले आहे. इंग्लंड आणि रशिया यांच्यातील द्वंद्व हे सर्वज्ञात आहेच. त्यांच्यातील राजकीय, वैचारिक मतभेद आणि इतिहासाची किनार, यामुळे उभय देशांमध्ये भांडणे ही नित्याचीच. मात्र, या वेळी इंग्लंडच्या माध्यमातून फ्रान्सवरही निशाणा साधण्याची संधी रशियाने साधली. फ्रान्स आणि रशिया यांच्यात २४ जून ते १४ डिसेंबर १८१२ या काळात झालेला हिंसाचार हा त्याला कारणीभूत आहे. या युद्धात जवळपास सहा लाखांहून अधिक लोकांचे बळी गेले. म्हणूनच रशियाच्या सामन्यात मोठय़ा प्रमाणात फौजफाटा तैनात करण्याचे आदेश स्पध्रेपूर्वीच देण्यात आले होते. रशियन चाहतेही संपूर्ण तयारीनिशी फ्रान्समध्ये दाखल झाले होते. त्याचे प्रत्यंतर इंग्लंड आणि रशिया यांच्यातील सामन्याआधी आणि सामन्यानंतर आलेच. हे असेच घडणार, याची पूर्वकल्पना असल्यामुळे पोलिसांचा ताफा स्टेडियमभोवती होता. तरीही जे घडायचे ते घडलेच. सामन्याआधी स्टेडियमबाहेर रशिया आणि इंग्लंडचे चाहते एकमेकांना भिडले आणि स्टेडियममध्येही हेच चित्र दिसले. यामध्ये इंग्लंडचे चाहते सर्वाधिक दुखापतग्रस्त झाले. दोघे तर कोमात गेले. हा हिंसाचार इथेच थांबला नाही. इंग्लंड आणि वेल्स यांच्या लढतीनंतरही रशियन चाहत्यांकडून इंग्लंडच्या चाहत्यांना लक्ष्य करण्यात आले. मात्र, या वेळी इंग्लंड आणि वेल्सच्या चाहत्यांकडून रशियाबाबत अश्लील वाक्य वापरण्यात आल्याने हा वाद झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा