आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) भारताला २०१७मध्ये १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क दिल्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. फिफाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे देशातील फुटबॉलचा चेहरामोहरा बदलेल, असे मत फुटबॉल क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केले.
याविषयी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले की, ‘‘भारताला यजमानपदाची संधी मिळाल्यामुळे देशातील फुटबॉलचा दर्जा उंचावण्यास मदत होईल. याच क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहात होतो. भारतीय फुटबॉलला जागतिक स्तरावर आणण्यासाठीच्या आमच्या महत्त्वाकांक्षेला फिफाकडून पाठिंबा मिळत आहे. प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या संयोजनामुळे देशातील युवा पिढी या खेळाकडे वळेल, अशी आशा आहे.’’
महान फुटबॉलपटू चुनी गोस्वामी म्हणाले, ‘‘फिफा विश्वचषकासारख्या स्पर्धेचे आयोजन केल्यामुळे देशातील सोयीसुविधांमध्ये कमालीचे बदल घडून येतील. त्याचबरोबर भारताच्या युवा फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. भारतीय फुटबॉलच्या विकासाच्या दिशेने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आता या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरिता सर्वानी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे.’’
भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार आय. एम. विजयन म्हणाले की, ‘‘ही स्पर्धा यशस्वी करण्याची क्षमता भारतामध्ये आहे. युवा आणि कनिष्ठ स्तरावर आपण चांगली लढत देऊ शकतो, असे मला वाटते. भारतीय फुटबॉलच्या क्रांतीची ही सुरुवात आहे.’’
भारतीय संघाचा गोलरक्षक सुब्रतो पाल म्हणाला, ‘‘भारतीय फुटबॉलमध्ये घडलेली आतापर्यंतची ही सर्वात मोठी गोष्ट म्हणावी लागेल. भारत फिफा विश्वचषकाचे आयोजन करेल, असे मला कधीही वाटले नव्हते, पण आमचे स्वप्न आता सत्यात उतरू लागले आहे. त्याची सुरुवात १७ वर्षांखालील फिफा विश्वचषकाच्या यजमानपदाने झाली आहे. एके दिवशी आपण फिफा विश्वचषकाचेही आयोजन करू, अशी खात्री आहे.’’

Story img Loader