ज्ञानेश भुरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेने (फिफा) जियानी इन्फॅन्टिनो यांच्या अध्यक्षतेत शुक्रवारी एक ऐतिहासिक निर्णय प्रत्यक्षात उतरवला. या निर्णयानुसार आता क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धा दर चार वर्षांनी खेळविली जाईल आणि स्पर्धेत ३२ संघांचा समावेश असेल. २०२५ मध्ये अशा पद्धतीने होणाऱ्या पहिल्या स्पर्धेच्या आयोजनाची संधी अमेरिकेला देण्यात आली. हा निर्णय का घेण्यात आला आणि अमेरिकेला यजमानपद कसे मिळाले घेतलेला आढावा.

क्लब विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाचा अधिकार अमेरिकेलाच का?

३२ संघांचा समावेश असलेल्या क्लब विश्वचषकाच्या आयोजनाचा अधिकार अमेरिकेला देण्याचे मुख्य कारण म्हणजे तेथे उपलब्ध असणाऱ्या पायाभूत सुविधा. पुढील वर्षी २०२४ मध्ये कोपा अमेरिका स्पर्धा अमेरिकेत होणार आहेत. यामुळे नव्याने पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज भासणार नाही. त्याचबरोबर २०२६ मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेचे मेक्सिको व कॅनडासह अमेरिका संयुक्त यजमान आहेत. विश्वचषक स्पर्धेपूर्वी ही क्लब विश्वचषक स्पर्धा होणार असल्यामुळे २०२६ मधील विश्वचषक स्पर्धेसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा अमेरिकेत उपलब्ध होऊ शकणार आहेत. स्थानिक जनतेतही फुटबॉलविषयी कमालीचे आकर्षण असल्यामुळे नव्या धाटणीच्या क्लब विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद अमेरिकेलाच देण्यात आले.

क्लब विश्वचषक स्पर्धेतील संघांची संख्या वाढविण्याचे कारण काय?

विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत केवळ सात संघांचा समावेश ही गोष्ट अनेकांना पटत नव्हती. त्यातच ही स्पर्धा दर वर्षाला होणे योग्य नसल्याचे अनेकांचे मत होते. मात्र, ‘फिफा’ला क्लब विश्वचषक स्पर्धेत व्यापक आकर्षण हवे होते. त्याचबरोबर चार वर्षांनी एकदा ही स्पर्धा घेतली, तर अधिक संघांना सामावून घेता येईल, एक पूर्ण आकाराची स्पर्धा आयोजित करता येईल आणि क्लबमधील एकत्रित गुणवत्ता समोर येईल या उद्देशाने ‘फिफा’ने क्लब विश्वचषक स्पर्धेतील संघांची संख्या वाढवली. दुसरा भाग म्हणजे ‘फिफा’ने २०२१ मध्ये सुपर लीगचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा त्यांचा निर्णय फसला. तेव्हा सर्वप्रथम ‘फिफा’ने क्लब विश्वचषक स्पर्धेची व्यापकता वाढविण्याचा निर्णय घेतला.

विश्लेषण: भारतीय संघात स्थान मिळवण्यात जैस्वाल का ठरला ‘यशस्वी’?

आतापर्यंत ही स्पर्धा कशी खेळवली जात होती?

फुटबॉलच्या आजपर्यंतच्या इतिहासातील ही सर्वाधिक स्पर्धक संघांची स्पर्धा असेल. ‘फिफा’ने २०२५ सालापासून ३२ संघांमध्ये ही स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ही स्पर्धा केवळ सात संघांमध्ये होत होती. यामध्ये सहा खंडीय स्पर्धेतील विजेते आणि एक यजमान देशाचा राष्ट्रीय विजेता असे सात संघ खेळत होते. आता या वर्षी होणारी क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धा ही सात संघांची अखेरची स्पर्धा असेल.

संख्या वाढवल्याने नेमके काय साधणार आणि स्पर्धेचे स्वरूप कसे असणार?

अमेरिकेत होणारी ही २०२५ मधील स्पर्धा ही केवळ अमेरिकाच नाही, तर ‘फिफा’साठीही महसूल निर्माण करण्यासाठी मोठी व्यावसायिक संधी असेल. यामुळे नवे प्रायोजक पुढे येऊ शकतात. त्याचबरोबर लाखो डॉलरच्या बक्षीस रकमेचा निधी उपलब्ध होऊ शकेल. स्पर्धेचे आयोजन केंद्र निश्चित झाले असले, तरी स्पर्धेचे स्वरूप निश्चित नाही. सहभागी ३२ संघांना चार संघांच्या आठ गटांत विभागले जातील. त्यानंतर आठ गटांतील विजेते उपांत्यपूर्व फेरीसाठी लढतील. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्याचा समावेश झाल्यास स्पर्धेत ५६ सामने खेळवले जातील.

विश्लेषण : बल्क SMS च्या माध्यमातून शेअर मार्केट घोटाळा कसा झाला? सेबीने १३५ संस्थांना व्यवहार करण्यापासून का रोखले?

२०२५ विश्वचषक स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरलेले संघ किती?

या स्पर्धेसाठी काही संघांचा प्रवेश आधीच निश्चित झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने पालमीरास (ब्राझील), फ्लेमिंगो (ब्राझील), मॉन्टेरी (मेक्सिको), लियॉन (मेक्सिको), अल अहली (इजिप्त), वायदाद कॅसाब्लांका (मोरोक्को), उरावा रेड डायमंड्स (जपान), अल हिलाल (सौदी अरेबिया) या क्लब संघांचा समावेश आहे. अन्य सहभागी संघांमध्ये युरोपमधील १२ संघ असतील. यामध्ये २०२१ ते २०२४ या कालावधीतील चॅम्पियन्स लीग विजेत्या संघांचा समावेश असेल. म्हणजेच चेल्सी (२०२१चे विजेते), रेयाल माद्रिद (२०२२), मँचेस्टर सिटी (२०२३) यांचा सहभाग निश्चित आहे. युरोपातील अन्य आठ संघ हे त्यांच्या मानांकनानुसार ठरतील. सिॲटल साऊंडर्स हा उत्तर अमेरिकेतील एक संघ कॉनकॅफ स्पर्धेतील विजेता म्हणून क्लब विश्वचषक स्पर्धेच्या शर्यतीत आहे. अर्थात, यजमान राष्ट्र म्हणून अमेरिकेला आणखी प्रवेश देण्याचा निर्णय झाल्यास सिॲटल संघाचा मार्ग मोकळा होईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Football international federation fifa club world cup every four years print exp pmw