क्रीडाविश्वाला असलेला गैरप्रकारांचा विळखा आणखी घट्ट होत चालल्याचे दिसून येत आहे. जगात सर्वाधिक लोकप्रिय खेळ असलेल्या फुटबॉलला फिक्सिंगची वाळवी लागली आहे. इंग्लिश प्रीमिअर लीगमधील फुटबॉलचे सामने निश्चित (मॅचफिक्सिंग)  केल्याच्या आरोपांवरून पोलिसांनी तीन खेळाडूंसह आणखी काही व्यक्तींना अटक केली आहे.
सट्टेबाजीचे रॅकेट चालवण्याचा आरोपांवरून तीन खेळाडू तसेच डेलरॉय फेसये हा माजी खेळाडू आणि आता मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा समावेश आहे. ‘डेली टेलिग्राफ’च्या वृत्तानुसार,  आशिया खंडातील काही व्यक्ती इंग्लंडमधील फुटबॉलचे सामने निश्चित करत असल्याचे उघड झाले
होते. ब्रिटनमधील राष्ट्रीय गुन्हे संघटनेच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘‘संघटनेच्या तपासाचा भाग म्हणून देशभरातून सहा व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांतील संशयित बेटिंग रॅकेटचा उद्ध्वस्त करणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. गॅम्बलिंग आयोग तसेच फुटबॉल असोसिएशन यांच्या सहकार्याने हे तपासकार्य सुरू आहे. मात्र तूर्तास अधिक माहिती उघड करता येणार नाही.’’ ५० हजार युरोंसाठी हे फुटबॉलचे सामने निश्चित करण्यात येत असल्याचे एका स्टिंग-ऑपरेशनद्वारे समोर येत आहे.