कुमार (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे बिगूल वाजले असले तरी यंदाच्या स्पर्धेत गतविजेत्या नायजेरी संघाला पात्रता मिळवण्यात अपयश आले. २०१३ आणि २०१५मध्ये चषक उंचावणाऱ्या नायजेरियाला भारतात जेतेपदाची हॅट्ट्रिक करण्याची संधी होती. मात्र आफ्रिकन फुटबॉलच्या पात्रता स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांना धडक मारण्यात अपयश आले आणि त्यांचे भारतात खेळण्याचे स्वप्न मावळले. भारतातील स्पर्धेत नायजेरियाचा सहभाग नसल्याची खंत माजी खेळाडू कालू उचेने व्यक्त केली.
इंडियन सुपर लीगमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स क्लबचे प्रतिनिधित्व करणारा कालू भारतातील क्रीडाक्षेत्राशी चांगलाच परिचित आहे. २०१०च्या विश्वचषक स्पर्धेत नायजेरिया संघाचे प्रतिनिधित्व करणारा कालू म्हणाला, ‘‘काय चुकीचे झाले, त्यावर मी भाष्य करणार नाही. पण गतविजेता नायजेरिया या विश्वचषक स्पर्धेत खेळत नसल्याने खूप निराश आहे. फुटबॉलमध्ये हे असे घडत असते, परंतु संघाने मोठी संधी गमावली. १७ वर्षांखालील विश्वचषक हा युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याचे मोठे व्यासपीठ आहे. या स्पर्धेत आम्ही पात्र ठरलो नाही, हे दुर्दैवी आहे.’’
याचप्रमाणे झालेल्या चुकांतून शिकवण घेत पुढील स्पर्धेच्या तयारीसाठी आत्तापासून सुरुवात करण्याचा सल्लाही कालूने नायजेरियाच्या खेळाडूंना दिला. वयचोरी प्रकरणाबाबत खंत व्यक्त करताना तो म्हणाला, ‘‘खेळाडूंनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून वाटचाल करायला हवी. त्यांनी आत्तापासूनच अथक मेहनत घ्यायला हवी. वयचोरी प्रकरणात नक्की काय घडले याची कल्पना नाही. पण या घटनेने अत्यंत दु:खी झालो आहे. महासंघाने हा प्रश्न सोडवायला हवा.’’
ला लिगा स्पर्धेत अल्मेरिया क्लबचे ११७ सामन्यांत प्रतिनिधित्व करताना कालूने २७ गोल केले आहेत. कुमार विश्वचषक स्पर्धेत जेतेपद कोण पटकावेल, यावर तो म्हणाला, ‘‘वरिष्ठ स्पर्धेप्रमाणे कुमार विश्वचषक स्पर्धेतही निकालाचा अंदाज लावणे कठीण आहे. या स्पर्धेत अनेक चांगले संघ आहेत, परंतु माझ्या मते ब्राझील, स्पेन, जर्मनी आणि इंग्लंड या संघांमध्ये अंतिम लढती असतील.’’