वृत्तसंस्था, दोहा : आघाडीपटू कोडी गाकपो आणि डेवी क्लासेनने दुसऱ्या सत्रात नोंदवलेल्या निर्णायक गोलच्या बळावर चुरशीच्या झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात नेदरलँड्सने सोमवारी सेनेगलवर २-० असा विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघांमध्ये चांगली चुरस पहायला मिळाली. नेदरलँड्सने प्रथम सेनेगलच्या बचावावर आक्रमण केले, मात्र सेनेगलच्या बचाव फळीने ते परतवून लावले. यानंतर पहिल्या सत्रात नेदरलँड्सने गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. सेनेगलचेही आघाडी घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते, परंतु त्यांच्या पदरीही निराशा आली. त्यामुळे मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत होता.
दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांचे लक्ष गोल करण्याकडे होते आणि त्यासाठी त्यांचे खेळाडू मैदानावर आक्रमक होतानाही दिसले. मात्र, गोल कोणत्याही संघाच्या दृष्टीपथात दिसत नव्हता. काहीसा विस्कळीत खेळ करणाऱ्या नेदरलँड्सला सामन्याच्या ८४व्या मिनिटाला गाकपोने हेडरच्या साहाय्याने गोल करत १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर सेनेगलच्या खेळाडूंचे बरोबरी साधण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, नेदरलँड्सच्या बचाव फळीने त्यांना कोणतीही संधी दिली नाही. यानंतर भरपाई वेळेत क्लासेनने सेनेगलच्या गोलरक्षकाला चकवत गोल झळकावत नेदरलँड्सची आघाडी दुप्पट केली.