दिल्ली क्रिकेट असोसिएशनने आपल्या अखत्यारित येणाऱ्या फिरोजशहा कोटला मैदानाच्या एका प्रवेशद्वाराला विरेंद्र सेहवागचं नाव दिलं. या प्रवेशद्वारावर सेहवागच्या कारकिर्दीतल्या महत्वाच्या क्षणांची माहिती देणारा एक फलक लावण्यात आला. या फलकावर दिल्ली क्रिकेट असोसिएशनने विरेंद्र सेहवागचा उल्लेख भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा एकमेव खेळाडू असा केला.
मात्र, दिल्लीकडून खेळणाऱ्या विरेंद्र सेहवागचं कौतुक करण्याच्या भरात DDCA करुण नायरला मात्र विसरली. करुण नायरने इंग्लंडविरुद्ध चेन्नईच्या मैदानावर त्रिशतक झळकवलं. विरेंद्र सेहवाग हा भारताकडून त्रिशतक झळकावणारा पहिला खेळाडू आहे. या सोहळ्यानंतर विरेंद्र सेहवागने पत्रकारांशी संवाद साधत आपलं नाव मैदानाच्या प्रवेशद्वाराला दिलं जाणं हा मोठा सन्मान असल्याचं म्हटलं. मात्र, लोकांच्या नजरेतून दिल्ली क्रिकेट असोसिएशनने केलेली ही घोडचूक सुटली नाही.
DDCA honours @virendersehwag , forgets @karun126’s triple hundred. On Gate No 2, “ only Indian to score 300 in Tests”. New board maybe pic.twitter.com/jrFlTLguUM
— Sahil Malhotra (@Sahil_Malhotra1) October 31, 2017
आपलं नाव मैदानाला दिल्याने अनेक होतकरु खेळाडूंना याचा फायदा होणार असल्याचं सेहवाग म्हणाला. याच मैदानावर आपण आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. फिरोजशहा मैदानाशी आपलं खास नातं असल्याचंही सेहवागने यावेळी आवर्जून नमूद केलं.