Dhruv Jurel Selection in Indian Test Team : बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारताचा संघ जाहीर केला आहे. या १६ सदस्यीय संघा ध्रुव जुरेल यालाही स्थान मिळाले आहे. ध्रुव जुरेलची टीम इंडियाच्या कसोटी मालिकेसाठी पहिल्यांदाच निवड झाली आहे. इशान किशन आणि ऋषभ पंत सारख्या यष्टीरक्षक फलंदाजांची अनुपलब्धता आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या दमदार कामगिरीमुळे ध्रुवला कसोटी संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे आज आपण हा युवा यष्टीरक्षक फलंदाज कोण आहे? जाणून घेऊया.
ध्रुव जुरेल फक्त २२ वर्षांचा आहे. आयपीएलमधील राजस्थान रॉयल्ससाठी त्याच्या स्फोटक पदार्पणाच्या खेळीने त्याला प्रथमच प्रसिद्धीच्या झोतात आणले. मात्र, हा खेळाडू १९ वर्षांखालील क्रिकेट आणि देशांतर्गत स्पर्धांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. अगदी लहान वयातच त्याने ठरवले होते की आपल्याला क्रिकेटर व्हायचे आहे. यानंतर त्याची जिद्द आणि मेहनत आज इथे घेऊन आली आहे.
जेव्हा ध्रुव जुरेलने आयपीएल २०२३ मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी स्फोटक खेळी साकारली, तेव्हा एका मुलाखतीत त्याने क्रिकेटच्या वेडाशी संबंधित अनेक किस्से सांगितले होती. त्यापैकी एक किस्सा खूपच भावनिक होता. ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना त्याने सांगितले होते की, त्याच्या आईने स्वत:ची सोनसाखळी विकून त्याला क्रिकेटची किट बॅग खरेदी करुन दिली होती.
हेही वाचा – WPL 2024 : महिला प्रीमियर लीगबद्दल मोठी अपडेट, ‘या’ दोन शहरांमध्ये खेळवला जाणार दुसरा हंगाम
क्रिकेट किट बॅगचा हट्ट आणि आईचा त्याग –
ध्रुव जुरेलने सांगितले होते की, “मी १४ वर्षांचा असताना, माझ्या वडिलांकडे काश्मीर विलो बॅट खरेदी करण्यासाठी हट्ट केला होता. तेव्हा या बॅटची किंमत १५०० ते २००० पर्यंत होती. त्यावेळी ती खूप मोठी किंमत होती पण माझ्या वडिलांनी माझ्यासाठी ती विकत घेतली. पण जेव्हा संपूर्ण किट बॅगचा प्रश्न होता, तेव्हा तर ती आणखी महाग होती.”
ध्रुव जुरेल पुढे म्हणाला, “क्रिकेट किट बॅग घेण्यासाठी मी स्वत:ला बाथरूममध्ये कोंडून घेतले होते. त्याचबरोबर जर माझ्यासाठी क्रिकेटची किट बॅग आणली नाही, तर पळून जाण्याची धमकी दिली. यामुळे माझी आई खूप भावूक झाली. तिने स्वत:ची सोनसाखळी माझ्या वडिलांना दिली आणि ती विकून किट आणण्यास सांगितले. जेव्हा हे घडले तेव्हा मला खूप आनंद झाला, पण जेव्हा मला या गोष्टी समजू लागल्या, तेव्हा मला कळले की हा किती मोठा त्याग आहे.”
हेही वाचा – IND vs AFG : ‘तो टी-२० विश्वचषकातील…’, शिवम दुबेबद्दल सुरेश रैनाची मोठी भविष्यवाणी
ध्रुव जुरेलच्या आईच्या त्यागाची कहाणी इथेच संपत नाही. जेव्हा जुरेलने क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी आग्रा ते नोएडा येथे प्रवास सुरू केला, तेव्हा त्याच्या प्रवासात बराच वेळ जाऊ लागला. तेव्हा त्याच्या आईने त्याला नोएडाला जाण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर आपल्या मुलासाठी ती काही काळ नोएडामध्येही राहिली.