सचिन तेंडुलकर म्हणजे आपल्या खेळाद्वारे तमाम भारतीयांना निखळ आनंद मिळवून देणारे दैवत. क्रिकेटपाठोपाठ सचिन वेगाचाही तितकाच चाहता आहे. सचिनचे ‘वेग’प्रेम आणि फॉम्र्युला-वनशी असलेले ऋणानुबंध सर्वश्रुत आहेत. हाच सचिन मुंबईत पुढील महिन्यात होणाऱ्या २००व्या कसोटीनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. म्हणूनच सहारा फोर्स इंडियाने आपल्या कारवर  ‘मास्टरब्लास्टर’ असे नाव लिहून सचिनला मानवंदना दिली आहे.
याविषयी सहारा फोर्स इंडियाचे सहमालक विजय मल्ल्या म्हणाले की, ‘‘क्रिकेट हा भारतात धर्म समजला जातो आणि सचिन हे तमाम भारतीयांसाठी दैवतासमान आहे. भारताने जगाला सर्वोत्तम क्रिकेटपटू दिला तो सचिनच्या रूपाने. सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्यामुळे आम्ही त्याला मानवंदना देण्याचे ठरवले आहे. कारच्या पुढील दर्शनीय भागावर आम्ही ‘मास्टरब्लास्टर’ असे नाव लिहिले आहे.’’ २०११मध्ये भारतात पहिल्यांदाच झालेल्या इंडियन ग्रां. प्रि. शर्यतीला सचिनने झेंडा दाखवून सुरुवात केली होती. महान ड्रायव्हर आणि चांगला मित्र असलेल्या मायकेल शूमाकरने दशकभरापूर्वी फेरारी कार भेट म्हणून दिली होती. आता वेगाचा चाहता असलेला पण लाहली येथे होणाऱ्या रणजी सामन्याच्या सरावात व्यस्त असलेला सचिन रविवारी रंगणाऱ्या इंडियन ग्रां. प्रि. शर्यतीला उपस्थित लावतो का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, संघ मालकांच्या झालेल्या पत्रकार परिषदेत अनेक मुद्दय़ांवर चर्वितचर्वण झाले. यापुढे भारतात पुन्हा फॉम्र्युला-वन शर्यत होणार का, असे विचारले असता मल्ल्या म्हणाले, ‘‘शुक्रवारी सकाळीच मी शर्यतीचे संचालक आणि बुद्ध इंटरनॅशनल सर्किटचे मालक जयप्रकाश गौर यांच्याशी याविषयी सविस्तर चर्चा केली. २०१४ मोसमाच्या सुरुवातीला आणि सहा महिन्यांच्या कालावधीत भारतात दुसऱ्यांदा शर्यत आयोजित करणे शक्य होणार नसल्यामुळेच पुढील वर्षी इंडियन ग्रां. प्रि.चा समावेश करता आला नाही. भारतात फॉम्र्युला-वनविषयी जबरदस्त उत्साह आहे. त्यामुळे २०१५च्या मोसमापासून दरवर्षी फॉम्र्युला-वन शर्यत होईल, असे आश्वासन गौर यांनी दिले.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा