भारतीय क्रिकेट संघ सध्या टी२० विश्वचषक २०२२ मध्ये सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियात आहे. टीम इंडिया व्यतिरिक्त भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर हे देखील सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. जयशंकर यांनी सोमवारी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांची भेट घेतली. कॅनबेरा येथे दोन्ही राजनैतिक अधिकाऱ्यांची बैठक झाली. यादरम्यान भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाच्या उपपंतप्रधानांना विशेष भेट दिली. ही भेट काही नसून भारतीय फलंदाज विराट कोहलीची बॅट आहे.
जयशंकर यांनी विराटची सही असलेली बॅट रिचर्ड यांना भेट दिली. दोन्ही नेत्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान मार्ल्स यांनी स्वत: त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून जयशंकर यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, क्रिकेटवरील प्रेमासह अनेक गोष्टी आपल्याला बांधून ठेवतात. मार्ल्स पुढे म्हणाले की, आज जयशंकर यांनी क्रिकेटचा दिग्गज कोहलीची स्वाक्षरी केलेली बॅट देऊन आश्चर्यचकित केले.
या वर्षाच्या सुरुवातीला जयशंकर यांनी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे विराट कोहलीची स्वाक्षरी केलेली बॅट ऑस्ट्रेलियामधील त्याच स्टेडियमचे मुख्य अध्यक्ष मारिस पायने यांना भेट दिली होती. देशाच्या सामरिक दृष्टीकोनातून विचार करता हिंदी महासागरात चीनच्या हालचाली आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशात वाढत्या लष्करी प्रभावादरम्यान जयशंकर यांनी चिंता व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, “ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स यांना भेटून आनंद झाला. प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षेवर विचार विनिमय केला. आमचे वाढते संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य शांततापूर्ण, समृद्ध आणि नियमांवर आधारित इंडो-पॅसिफिकची खात्री देते,” परराष्ट्र मंत्री काही भेटवस्तू देत असल्याचा फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
जयशंकर फेब्रुवारीमध्ये क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेले होते. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन आणि जपानचे परराष्ट्र मंत्री योशिमासा हयाशी यांच्या उपस्थितीत जयशंकर यांनी पायने यांना बॅट भेट दिली. जयशंकर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे मुद्दे प्रभावीपणे मांडण्यासाठी ओळखले जातात. परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी युक्रेन रशिया युद्धावेळी निर्णायक भूमिका पार पाडली होती. त्यानंतर आता ते ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यावर ते अनेक महत्त्वपूर्ण करारांविषयी चर्चा करतील.