आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आज (१५ ऑगस्ट) ७५वर्षे झाली आहेत. त्यानिमित्त देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. नागरिकांच्या मनात देशभक्तीच्या भावनेची ज्योत सतत तेवत ठेवण्यात खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावत असतात. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवून क्रीडापटू देशाचा गौरव वाढवतात. याशिवाय, स्पर्धा खेळत असताना ते आपल्या देशाच्या संस्कृतीचा प्रसारही करत असतात. याचीच परिणीती म्हणून अनेक विदेशी खेळाडूसुद्धा भारताचा आदर करतात. आज भारताच्या स्वातंत्र्यदिनी विदेशी क्रिकेटपटूंनी भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार डेरेन सॅमीने भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने भारतात झालेल्या टी २० विश्वचषकासोबत स्वत:चा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. “ज्या देशात मी माझा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलो अशा भारताला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,” असे कॅप्शन सॅमीने आपल्या फोटोला दिले आहे.
याशिवाय, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून भारतीय चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरने लिहिले, “भारतात उपस्थित असलेल्या सर्व मित्र आणि कुटुंबीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.”
हेही वाचा – Video: वडिलांनी शतक झळकावताच आनंदाने नाचू लागली चिमुकली; चाहत्यांनीही केले कौतुक
इंडियन प्रीमियर लीगमुळे वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया येथील खेळाडू भारतात खूप लोकप्रिय झाले आहेत. येथील चाहत्यांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात प्रेम आणि आदर मिळतो. याचीच जाण ठेवत, डेरेन सॅमी आणि डेव्हिड वॉर्नरने भारतीय चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या कृतीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
दरम्यान, स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय क्रिकेटपटूंनीही देशबांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभाग घेतला आहे. माजी क्रिकेटपटू इरफान पठाण, मोहम्मद कैफ यांनीही आपल्या घरी तिरंगा फडकवला आहे. यासोबतच त्यांनी चाहत्यांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे.