भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधले सामने हे नेहमीच उत्कंठावर्धक होतात. खेळ क्रिकेट असो किंवा इतर कोणताही या सामन्यांना क्रीडा रसिकांचाही नेहमी पाठींबा मिळतो. क्रिकेटच्या मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातलं द्वंद्व आपण अनेकदा अनुभवलं आहे, बहुतांश वेळा भारताने पाकिस्तानव बाजी मारली आहे. मात्र भारत क्रिकेटमध्येच नाही तर हॉकीतही पाकिस्तानच्या वरचढ असल्याचं समोर आलंय.
अवश्य वाचा – Asian Champions Trophy 2018: भारताने ९- ० ने उडवला जपानचा धुव्वा
2016 ते 2018 या कालावधीत भारत आणि पाकिस्तान हे हॉकी संघ तब्बल 10 वेळा समोरासमोर आले असून यापैकी भारत 9 सामने जिंकला असून एका सामन्यात पाकिस्तानने बरोबरी मिळवली आहे. सध्या मस्कत मध्ये सुरु असलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानवर 3-1 ने मात केली. हा भारताचा गेल्या 2 वर्षांतला पाकिस्तानविरुद्धचा 10 वा विजय ठरला आहे. 2018 साली ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पाकिस्तानने भारताला 2-2 असं बरोबरीत रोखलं होतं.
आतापर्यंत भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजयाची हॅटट्रीक साजरी केली आहे. सलामीच्या सामन्यात यजमान ओमानचा फडशा पाडल्यानंतर, भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 3-1 ने मात केली. यानंतर झालेल्या सामन्यात भारताने जपानचा 9-0 ने धुव्वा उडवला. नुकत्याच जकार्ता येथे पार पडलेल्या आशियाई खेळांमध्ये भारताला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. आगामी महिन्यात भारतात हॉकी विश्वचषक खेळवला जाणार आहे, त्या पार्श्वभूमीवर भारत या स्पर्धेत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.