पीटीआय
मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेदरम्यान खेळपट्टय़ांविषयी इतकी चर्चा कशासाठी होते आहे? भारतातील खेळपट्टय़ा नेहमी अशाच असतात. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी खेळपट्टय़ा व परिस्थितीशी जुळवून घ्यायला हवे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मायकल कॅस्प्रोविचने व्यक्त केले.
‘‘भारतीय खेळपट्टय़ांकडे उगाच लक्ष वेधले जात आहे. त्यात वेगळे असे काहीच नाही. भारतात खेळताना नेहमी अशाच खेळपट्टय़ा मिळतात. इंदूरला खेळ लवकर सुरू झाला, त्यामुळे खेळपट्टीतील दमटपणाचा फायदा मिळाला. त्यानंतर प्रत्येक सत्रात ती खेळपट्टी भारतात नेहमी दिसते, तशीच दिसली,’’ असे कॅस्प्रोविच म्हणाला. तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवल्यानंतरही माजी कर्णधार मार्क टेलर आणि मार्क वॉ यांनी इंदूर येथील खेळपट्टीवर टीका केली होती. या खेळपट्टीला सामनाधिकाऱ्यांनी ‘निकृष्ट’ असा शेरा दिला होता. भारतातील खेळपट्टय़ा नेहमीच कोरडय़ा असतात. त्यामुळे खेळपट्टी नक्की कशी असेल याचा अंदाज बांधणे किंवा त्यावर चर्चा करणे व्यर्थ आहे. तेथे जाऊन तुम्हाला खेळपट्टीशी जुळवून घ्यावेच लागते. खेळपट्टी आणि परिस्थितीशी जुळवून घेणे हेच तर खरे कसोटी क्रिकेट आहे, असेही कॅस्प्रोविच म्हणाला.
ऑस्ट्रेलियन संघाला भारतातील परिस्थितीशी जुळवून घ्यायला वेळ लागला. त्यांना दोन कसोटी सामन्यांत पराभव पत्करावा लागला. मात्र, त्यांनी तिसऱ्या कसोटीत ज्याप्रकारे पुनरागमन करत विजय मिळवला, ते कौतुकास्पद होते,’’ असेही कॅस्प्रोविचने नमूद केले.