सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड दरम्यान कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. हा सामना यजमान इंग्लंडने जिंकला. माजी कर्णधार जो रूटने नाबाद ११५ धावांची खेळी करून विजयामध्ये महत्त्वाचे योगदान दिले. या शतकी खेळीच्या जोरावर जो रूटने कसोटी क्रिकेटध्ये १० हजार धावांचा टप्पा पार करून इतिहास रचला. रूटने न्यूझीलंड विरुद्ध झळकावलेले शतक हे त्याच्या कसोटी कारकीर्दीतील २६वे शतक होते. त्यामुळे रूट आता विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या सर्वाधिक कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. कोहली आणि स्मिथ दोघांच्याही नावे २७ कसोटी शतकांची नोंद आहे. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरने जो रूटबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या जगाच्या कानाकोपऱ्यातून जो रूटवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरने तर रूटची तुलना सचिन तेंडुलकरशी केली आहे. टेलरच्या मते, कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करण्याचा सचिनचा विक्रम जो रूट सहज मोडू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने वैयक्तिक १५ हजार ९२१ धावांचा विक्रम रचलेला आहे. आजपर्यंत हा विक्रम कोणीही मोडू शकलेले नाही.

हेही वाचा – ENG vs NZ: जो रूटने रचला इतिहास, आता विराट कोहलीच्या ‘या’ विक्रमावर नजर

जो रूट हा कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारा जगातील १४वा आणि इंग्लंडचा दुसरा फलंदाज ठरला आहे. रूटच्या अगोदर माजी कर्णधार आणि फलंदाज अॅलिस्टर कुकने हा पराक्रम केलेला आहे. इतकेच नाही तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी कालावधीमध्ये सर्वात जलद १० हजार धावा पूर्ण करणारा रूट हा जगातील पहिला फलंदाज आहे. रूटने १० वर्षांपेक्षा कमी कालावधीत ही कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीवर मार्क टेलर फारच प्रभावित झाला आहे.

‘हेही वाचा – मी वकार युनूसला आदर्श मानत नाही कारण…’, तुलना सुरू असताना उमरान मलिकने दिली प्रतिक्रिया

‘मी गेल्या १८ महिन्यांपासून त्याला सतत फलंदाजी करताना बघितले आहे. सध्या तो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. तो कमीत कमी आणखी पाच वर्षे कसोटी क्रिकेट खेळू शकतो. त्यामुळे सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक धावांचा विक्रम त्याच्याकडून सहज मोडला जाऊ शकतो,’ असे टेलरचे म्हणणे आहे. स्काय स्पोर्ट्सशी बोलताना टेलरने हे वक्तव्य केले आहे.

मार्क टेलरच्या या वक्तव्याला इंग्लंडचे माजी कर्णधार नासेर हुसेन यांनीही पाठींबा दिला आहे. ते म्हणाले, “रूटने नेहमीच स्वत:ला जागतिक दर्जाचा खेळाडू म्हणून सिद्ध केले आहे. त्याचे तंत्र खूपच प्रगत आहे. त्याच्या खेळात सहजपणा आहे. त्यामुळे तो सहज धावांचा डोंगर निर्माण करू शकतो.”