* आयसीसीच्या कार्याध्यक्षपदावरून हकालपट्टी * निवृत्त न्यायमूर्ती ए. पी. शाह यांची लोकपाल म्हणून नियुक्ती
* हितसंबंधांसदर्भातील आचारसंहिता बिनविरोध संमत * रवी शास्त्री यांना आयपीएल प्रशासकीय समितीवरून वगळले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपेक्षेप्रमाणेच एन. श्रीनिवासन यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशासनातील संस्थान खालसा करण्यात आले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सोमवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत श्रीनिवासन यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्याध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. श्रीनिवासन यांच्याऐवजी बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर हे आयसीसीच्या कार्यकारी मंडळावर प्रतिनिधित्व करतील. याचप्रमाणे हितसंबंधांसदर्भातील आचारसंहिता बिनविरोधपणे संमत करण्यात आली, तर निवृत्त न्यायमूर्ती ए. पी. शाह यांची लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हितसंबंध आणि जावई गुरुनाथ मयप्पन आयपीएल गैरप्रकारांमध्ये अडकल्यामुळे श्रीनिवासन यांना बीसीसीआयचे अध्यक्षपद गमवावे लागले होते. मात्र, आता आयसीसीच्या कार्याध्यक्षपदावरूनही त्यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्या मालकीच्या इंडिया सिमेंट कंपनीचा आयपीएलमधील संघ चेन्नई सुपर किंग्जवर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता फक्त तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद श्रीनिवासन यांच्याकडे शिल्लक आहे.

‘‘मनोहर हे आयसीसीमध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करतील. त्यामुळे आयसीसीचे कार्याध्यक्षपद लवकरच ते स्वीकारतील,’’ असे सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले. आयसीसीच्या बैठकीला मनोहर हजर राहू शकले नाहीत, तर शरद पवार भारताचे प्रतिनिधित्व करतील.
‘‘स्वच्छ आणि पारदर्शक क्रिकेट मंडळ होण्याच्या दृष्टीने बैठकीत प्रत्येकाने आपले मत मांडले. हितसंबंधांच्या आचारसंहितेबाबत गांभीर्याने चर्चा झाली. निर्णयप्रक्रिया न्याय्य पद्धतीने व्हावी, या हेतूने बीसीसीआयने ए. पी. शाह यांची नियुक्ती केली असून, ते हितसंबंधांसंदर्भातील तक्रारींची दखल घेतील. मागील आर्थिक वर्षांचा ताळेबंद मंजूर करण्यात आला असून तो वेबसाइटवर उपलब्ध आहे,’’ असे मनोहर यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

तसेच हितसंबंधांच्या मुद्दय़ावरून रवी शास्त्री यांना आयपीएल प्रशासकीय समितीवरून वगळण्यात आले आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेपर्यंत शास्त्री भारतीय संघाचे संचालक म्हणून कार्यरत असणार आहे. याचप्रमाणे आयपीएल प्रशासकीय समितीवर राजीव शुक्ला यांनाच कायम ठेवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. ज्योतिरादित्य शिंदे, एम. पी. पांडव, अजय शिर्के आणि सौरव गांगुली हे प्रशासकीय समितीचे अन्य सदस्य असतील.

रॉजर बिन्नी यांनी निवड समिती सदस्यत्व गमावले
’राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य असलेल्या रॉजर बिन्नी आणि राजिंदर सिंग हंस यांना आपले पद गमवावे लागले. त्यांच्या जागी अनुक्रमे एम. एस. के. प्रसाद आणि गगन खोडा यांना निवड समितीवर स्थान देण्यात आले आहे. रॉजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट भारतीय संघातून खेळत असल्यामुळे हितसंबंधांच्या मुद्दय़ांमुळे त्यांना वगळण्यात आले, तर हंस यांची कामगिरी असमाधानकारक असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. संदीप पाटील (अध्यक्ष), विक्रम राठोड आणि साबा करीम हे वरिष्ठ निवड समितीवरील अन्य सदस्य आहेत.
’‘‘स्टुअर्टला निवड समिती सदस्याचा मुलगा म्हणून टीकेला सामोरे जावे लागते. स्टुअर्टवर अन्याय होऊ नये, म्हणून रॉजर बिन्नी यांना वगळण्यात आले आहे,’’ असे मनोहर यांनी स्पष्ट केले.
’कनिष्ठ निवड समितीचे अध्यक्षपद वेंकटेश प्रसाद यांच्याकडे असेल, तर राकेश पारिख, ग्यानेंद्र पांडे, अमन कुमार, अरुप भट्टाचार्य हे निवड समितीवरील अन्य सदस्य असतील. महिलांच्या निवड समितीचे अध्यक्षस्थान शांता रंगास्वामी यांच्याकडे असेल. अंजली पेंढाकर, सुनीता शर्मा, हेमलता काळे आणि लोपामुद्रा बी. या अन्य सदस्या असतील.

भारत-पाकिस्तान मालिकेचा निर्णय केंद्र सरकारचा
भारत-पाकिस्तान मालिकेचा निर्णय केंद्र सरकारच्या हाती आहे. सरकारच्या भूमिकेनुसार या मालिकेचे भवितव्य ठरेल, अशी प्रतिक्रिया मनोहर यांनी व्यक्त केली. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या या प्रस्तावित मालिकेबाबत स्पष्टता झाल्यानंतरच या काळात अन्य कोणती मालिका खेळता येईल का, याबाबत विचार केला जाईल, असे ते पुढे म्हणाले.

पुण्यासह सहा ठिकाणांना कसोटी दर्जा
बीसीसीआयच्या बैठकीत पुण्यासह राजकोट, विशाखापट्टणम्, धरमशाला, इंदूर आणि रांची या सहा ठिकाणांना कसोटी क्रिकेटचा दर्जा देण्यात आला आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतरराष्ट्रीय स्टेडियम, राजकोटचे सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, विशाखापट्टणम्चे आंध्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशालाचे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, इंदूरचे होळकर स्टेडियम आणि रांचीचे झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन स्टेडियम या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कसोटी सामने यापुढे होऊ शकतील.

..तर चौथी कसोटी पुण्यात
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथी कसोटी दिल्लीमध्ये होऊ न शकल्यास पुण्यात होऊ शकेल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनला कसोटीसंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बीसीसीआयने १७ नोव्हेंबपर्यंत मुदत दिली आहे. दिल्लीकडून या अटींची पूर्तता न झाल्यास ही कसोटी पुण्याला बहाल करण्यात येईल.