फिफा विश्वचषक २०२२ ही स्पर्धा सध्या कतारमध्ये खेळली जात आहे. या दरम्यान एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. ब्राझीलचा माजी महान फुटबॉलपटू पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर काही गंभीर घडू शकते, असा दावा अनेक प्रकारच्या रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. पण पेले यांच्या मुलीने त्यांच्या आरोग्यबाबत अपडेट देऊन अफवांना पूर्णविराम दिला.
महान फुटबॉलपटू पेले कॅन्सरशी झुंज देत आहेत. यावेळी त्यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची मुलगी नॅसिमेंटोने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. गंभीर किंवा इमरजेंसी असे काहीही नसल्याचे तिने म्हटले आहे.
ईएसपीएन ब्राझीलने ८२ वर्षीय पेले यांना अल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त दिले आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये पेलेच्या कोलनमधून एक ट्यूमर काढण्यात आला होता. तेव्हापासून ते नियमितपणे रुग्णालयात तपासणी आणि उपचारांसाठी येत असतात. यावेळीही अशीच नियमित तपासणी आहे.
पेले यांची मुलगी केली नॅसिमेंटोने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, ”माझ्या वडिलांच्या प्रकृतीबाबत मीडियामध्ये अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत. ते रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात आले आहेत. कोणतीही इमरजेंसी नाही. तसेच ही गंभीर बाब नाही. मी नवीन वर्षासाठी येथे आहे आणि वचन देते की मी काही फोटो देखील पोस्ट करेन.”
ब्राझीलला तीन वेळा विश्वचषक जिंकून दिला आहे –
पेलेने आपल्या खेळाने फुटबॉल विश्वात मोठे नाव कमावले आहे. तो जगातील महान फुटबॉलपटू मानला जातो. १९५८ च्या विश्वचषकात त्यांनी धमाका केला होता. तेव्हा त्यांचे वय अवघे १७ वर्षे होते. १९५८ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पेलेने सुदानविरुद्ध दोन गोल केले होते. ५ वेळा फिफा विश्वचषक जिंकणारा ब्राझील हा जगातील एकमेव देश आहे.
हेही वाचा – Fifa World Cup 2022 : टय़ुनिशियाकडून फ्रान्सचा पराभव
पेलेने आपल्या कारकिर्दीत (१९५८, १९६२ आणि १९७०) तीन वेळा ब्राझीलसाठी विश्वचषक जिंकला आहे. तसेच, त्यांनी स्वतः ब्राझीलसाठी ९२ सामन्यात ७७ गोल केले आहेत. पेलेने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत एकूण १३६३ सामने खेळले असून त्यामध्ये आणि १२८१ गोल केले आहेत.