पीटीआय, नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यकारी परिषदेवर भारतीय क्रिकेटपटूंच्या संघटनेचे (आयसीए) प्रतिनिधी म्हणून माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर आणि शुभांगी कुलकर्णी यांची शनिवारी निवड झाली. महिलांमध्ये कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली, तर पुरुषांमध्ये वेंगसरकर यांनी ‘आयसीए’चे मावळते अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू अशोक मल्होत्रा यांच्यावर मात केली. तीन दिवस चाललेल्या ई-मतदान प्रक्रियेत वेंगसरकर यांना ४०२, तर मल्होत्रा यांना २३० मते मिळाली.
६६ वर्षीय वेंगसरकर यांना क्रिकेट प्रशासनाचा अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. ‘‘मला मत देणाऱ्या सर्व माजी क्रिकेटपटूंचे मी आभार मानतो. मी ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्यांची अजून भेट घेतलेली नाही; परंतु ‘आयसीए’ आणि ‘बीसीसीआय’ यांच्यात चांगला समन्वय असेल हे मी खात्रीने सांगतो,’’ असे वेंगसरकर म्हणाले. भारताचा माजी फिरकीपटू प्रग्यान ओझाने ‘आयपीएल’च्या कार्यकारी परिषदेवरील आपले स्थान राखले. त्याने विजय मोहन राज यांच्यावर मात केली. ओझाला ३९६ आणि विजय यांना २३४ मते मिळाली.
‘आयसीए’चे मंडळ
- अध्यक्ष : अंशुमन गायकवाड
- सचिव : हितेश मजुमदार
- कोषाध्यक्ष : व्ही. कृष्णास्वामी
- सदस्यांचे प्रतिनिधी : शांता रंगास्वामी व यजुर्वेद्र सिंग बिल्खा