पीटीआय, नवी दिल्ली
जवळपास दीड वर्ष संघाबाहेर राहिल्यानंतर अजिंक्य रहाणेची पुन्हा भारतीय कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी निवड होणे, ही बाब माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) माजी अध्यक्ष सौरव गांगुलीला फारशी पटलेली नाही. भारतीय संघाच्या निवडप्रक्रियेत सातत्याचा अभाव असल्याची गांगुलीने टीका केली आहे.
३५ वर्षीय रहाणेने जवळपास १८ महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन करताना जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीत चांगली कामगिरी केली. या महिन्याच्या सुरुवातीला ओव्हल येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने ८९ आणि ४६ धावा केल्या होत्या. पुनरागमनात केवळ एक सामना खेळल्यानंतर रहाणेची आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली. रहाणेने यापूर्वी सहा कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकाही जिंकली होती. मात्र, आता रहाणेला पुन्हा उपकर्णधारपद देण्यापेक्षा कसोटी संघातील स्थान निश्चित असलेल्या अन्य एखाद्या खेळाडूला ही जबाबदारी देणे योग्य ठरले असते असे गांगुलीला वाटते.
‘‘तुम्ही १८ महिने संघाबाहेर असता, त्यानंतर पुनरागमन करता, एक सामना खेळता आणि तुमची थेट उपकर्णधारपदी निवड होते. संघनिवडीची ही प्रक्रिया मला समजलेली नाही. तुमच्याकडे रवींद्र जडेजासारखा खेळाडू आहे, जो बऱ्याच वर्षांपासून सर्वोच्च स्तरावर खेळत असून त्याचे कसोटी संघातील स्थान पक्के आहे. त्याचा उपकर्णधारपदासाठी का विचार केला जात नाही? एखाद्या खेळाडूला पुनरागमनानंतर त्वरित उपकर्णधारपद देणे, ही बाब मला पटत नाही. संघनिवडीत सातत्य गरजेचे आहे,’’ असे गांगुलीने नमूद केले.
सर्फराजला संधी गरजेची
मुंबईकर फलंदाज सर्फराज खानला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली पाहिजे, असे गांगुलीला वाटते. ‘‘मला सर्फराजसाठी नक्कीच वाईट वाटते. त्याने गेल्या तीन वर्षांत रणजी करंडकात केलेली कामगिरी पाहता त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळाली पाहिजे. सर्फराज वेगवान गोलंदाजांविरुद्ध अडचणीत सापडतो असे म्हटले जाते. मात्र, तसे असते तर त्याला भारतात विविध खेळपट्टय़ांवर इतक्या धावा करताच आल्या नसत्या,’’ असे गांगुली म्हणाला.