गेल्या काही दिवसांपासून भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार आणि फलंदाज मिताली राज यांच्यातील वादांमुळे क्रिकेटविश्वात खळबळ माजली आहे. टी२० विश्वचषक स्पर्धेत पहिल्या तीन पैकी २ सामन्यात सामनावीराचा किताब पटकावलेल्या मितालीला उपांत्य फेरीसारख्या महत्वाच्या सामन्यात संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर मी मिताली आणि पोवार यांनी एकमेकांवर आरोप केले. या दोघांमध्ये झालेल्या वादाची वेळ ही अत्यंत चुकीची होती, असे मत माजी कर्णधार संदीप पाटील यांनी व्यक्त केले.

मिताली आणि पोवार या दोघांबरोबरही मी काम केले आहे. मी या दोघांनाही ओळखतो. या दोघांमध्ये वाद झाले याचे मला दुःख आहे. पण हे वाद उपांत्य फेरीच्या सामन्याआधी झाले, ही बाब सर्वात जास्त धक्कादायक होती. कारण तिला संघातून वगळण्यात आले आणि भारताला सामना गमवावा लागला, असे ते म्हणाले.

मोठ्या स्पर्धांमध्ये दडपण असते. त्यामुळे काही वेळा थोडी वादावादी होऊ शकते. पण या वादामुळे भारताला स्पर्धेतून बाहेर जावे लागले. तसेच या वादात दोघेही एकमेकांवर आरोप करत आहेत. त्यामुळे या वादात मी कोणाचीही बाजू घेणार नाही. पण वादाची वेळ अतिशय चुकीची होती, असे ते म्हणाले.