नामांकित प्रशिक्षक वासू परांजपे यांचे सोमवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी ललिता, दोन मुली आणि मुलगा जतीन असा परिवार आहे.

गेली सहा दशके भारतीय आणि विशेषत: मुंबईच्या क्रिकेटसाठी परांजपे यांनी प्रशिक्षक, निवड समिती सदस्य, मार्गदर्शक अशा अनेक भूमिका पार पाडल्या. वासूसरांप्रमाणे मुंबईच्या क्रिकेटची नाडी कुणालाच ठाऊक नाही, असे त्यांच्याविषयी म्हटले जाते. महान क्रिकेटपटू सुनील गावस्करला ‘सनी’ हे टोपणनाव त्यांनीच दिले.

२९ प्रथम श्रेणी सामन्यांत दोन शतकांसह ७८५ धावा अशी परांजपे यांची आकडेवारी फारशी लक्षवेधी नव्हती. पण खेळाची जाण आणि खेळाडूंच्या दृष्टिकोनावर मेहनत घेणे, हे त्यांचे वैशिष्टय़ होते. त्यांना हिंदी, इंग्रजी, मराठी आणि गुजरात अशा चार भाषा अवगत होत्या.

माजी क्रिकेटपटू आणि निवड समिती सदस्य मुलगा जतीनने क्रीडा पत्रकार आनंद वासू यांच्यासह परांजपे यांच्या जीवनावरील ‘क्रिकेट द्रोणा’ हे पुस्तक लिहिले होते. यात भारतामधील अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी त्यांची कारकीर्द घडवण्यात परांजपे यांचे कसे योगदान होते, हे नमूद केले आहे. ऐंशीच्या दशकात ते खेळाडूंना जीवनाकडे पाहण्याचा धडा द्यायचे. परांजपे यांच्या पत्नी ललिता या रुईया महाविद्यालयात त्या वेळी इंग्रजी वाङ्मय विभागाच्या प्रमुख होत्या. माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरने आपल्या पुस्तकात परांजपे दाम्पत्याचे अनुभव मांडले आहेत. दादर युनियनमध्ये परांजपे यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी ललिता यांच्या शैक्षणिक तासिकांना मुकावे लागल्याचे त्याने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाविषयी आदर

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट तत्त्वज्ञानावर परांजपे यांना अत्यंत विश्वास होता. ७०च्या दशकात दादर युनियनचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मैत्रीपूर्ण सामन्यांसाठी गेला, तेव्हा ते ऑस्ट्रेलियाच्या संघाची टोपी घालूनच फिरायचे, हे गावस्कर यांनी ‘सनी डेज’ या आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे.

’ १९८७च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेआधी मुंबईत झालेल्या भारतीय संघाच्या तयारी शिबिराला परांजपे यांनी मार्गदर्शन केले होते. स्वर्गीय राजसिंग डुंगरपूर यांनीच त्यांची नेमणूक केली होती.

’  क्लब क्रिकेटमधील महत्त्वाच्या दादर युनियनचे परांजपे हे कर्णधार होते. याच क्लबकडून सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर आणि विठ्ठल ‘मार्शल’ पाटील खेळले.

’ १९८७मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रथमच १५ वर्षांखालील वयोगटाचे राष्ट्रीय शिबिर इंदूरला आयोजित केले. या शिबिरातून सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, विनोद कांबळी, ध्रुव पांडव यांच्यासारख्या मातब्बरांना परांजपे यांचे मार्गदर्शन लाभले.

’ माजी वेगवान गोलंदाज डेनिस लिलीने देशात एमआरएफ पेस फाऊंडेशन योजना राबवली, तेव्हा ते त्यांचे साहाय्यक होते. साठ आणि सत्तरच्या दशकात परांजपे यांच्या आक्रमक नेतृत्वाची छाप होती.

वासू कधीही कोणाला फार तांत्रिक माहिती न सांगता गप्पांमधून खेळ सुधारण्याचे सहजपणे सल्ले देत. त्यांच्या अशा शिकवणीचा मला खूप उपयोग झाला.

–  सुनील गावस्कर, माजी क्रिकेटपटू

सचिन नेटमध्ये अथक फलंदाजी करीत राहायचा. परंतु वासू सर त्याला व्यक्तिश: जाऊन सांगायचे की, अन्य खेळाडूंनाही फलंदाजीची संधी दे!

– सौरव गांगुली, ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष

Story img Loader