माजी क्रिकेटपटू अरुण लाल दुसऱ्यांदा लग्न करणार आहेत. वयाच्या ६६ व्या वर्षी ते पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार असून ३८ वर्षीय बुलबुल साहा यांच्यासोबत ते संसार थाटणार आहेत. येणाऱ्या दोन मे रोजी ही जोडी लग्नबंधनात अडकणार असून कोलकात्यामधील हॉटेल पियरलेस इन येथे हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

हेही वाचा >>> मुंबईच्या प्ले ऑफपर्यंत पोहोचण्याच्या आशा मावळल्या, ट्विट करत रोहित शर्माने चाहत्यांना दिला खास संदेश, म्हणाला…

आजतकने याबाबत सविस्तर वृत्त दिलेले आहे. अरुण लाल यांनी लग्नाची तयारी सुरु केली आहे. याआधी त्यांनी आपली पहिली पत्नी रिनाोसबत कायदेशीररित्या घटस्फोट घेतलेला आहे. रिना मागील अनेक दिवसांपासून आजारी आहेत. रिना यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर आता अरुण लाल त्यांच्यापेक्षा २८ वर्षांनी लहान असलेल्या बुलबुल यांच्याशी लग्न करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अरुण लाल आणि बुलबुल मागील अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. लग्नानंतर ही जोडी जंगी रिसेप्शनदेखील देणार आहे.

हेही वाचा >>> IPL 2022 : मुंबई इंडियन्सचं काय चुकतंय ? रोहित शर्माने सांगितलं नेमकं कारण, म्हणाला…

अरुण लाल यांनी बंगाल टीमचे प्रशिक्षक म्हणून केलंय काम

अरुण लाल यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथे १९५५ च्या ऑगस्ट महिन्यात झाला. त्यांनी पश्चिम बंगालसाठी क्रिकेट खेळलेले आहे. या लग्नात क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अधिकारी तसेच अनेक क्रिकेटपटूंना आमंत्रित केले जाणार आहे. अरुण लाल यांना २०१६ साली कर्करोगाने ग्रासले होते. या आजारामुळे त्यांनी समालोचन करणे सोडून दिले होते. मात्र कर्करोगावर मात करुन त्यांनी पुन्हा एकदा बंगालच्या क्रिकेट संघाला प्रशिक्षण देणे सुरु केले.

हेही वाचा >>> LSG vs MI : मुंबईवर विजय मिळवूनही लखनऊचा संघ अडचणीत; कर्णधार राहुलला २४ लाखांचा दंड, बंदी घालण्याचीही शक्यता

अरुण लाल यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये १६ कसोटी आणि १३ एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. कसोटी सामन्यात त्यांनी ७२९ तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी १२२ धावा केलेल्या आहेत. अरुण लाल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९८२ साली इंग्लंडविरोधात खेळताना पदार्पण केले होते. त्यांनी आपला शेवटचा सामना १९८९ साली वेस्टइंडिजविरोधात खेळला होता.